डोंबिवली : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आदी शहरी भागातील रहिवाशांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली दिसून येऊ लागली आहे. ही उपद्रवी जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहेत. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते. या उपद्रवी जलपर्णीला खालसा करण्याचे नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे कडवे आव्हान आहे.
ठाणे जिल्ह्यातील 50/60 लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. आसपासच्या कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी आणि नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.
यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत, बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, आणि पुढे कल्याण येथे फार्महाऊस, इमारतींमधील सांडपाणी, रसायन, जनावरांचे तबेले, शहरांतून निघणारे सांडपाणी, ड्रेनेज लाईन, यांचे प्रक्रिया न केलेले पाणी सरळ उल्हास नदीच्या पात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत आहे.
22 मार्च 2025 रोजी जागतिक जलदिनी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, कैलाश शिंदे, श्रीनिवास घाणेकर, सुदाम गंगावणे या मंडळींनी नदी पात्रात बसून आंदोलन सुरू केले होते. 8 दिवसांनी राज्य शासनाद्वारे बैठक घेऊन 15 दिवसांत मशीन लावून जलपर्णी काढण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले होते.
अखेर स्वयंचलित मशीन लावून उल्हास नदीतील मोहना येथे जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम महाराष्ट्र प्रदुषण मंडळतर्फे करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा बदलापूर, रायते, कांब्याजवळ जलपर्णी जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात ती सर्वत्र पसरली जाईल, असे परिस्थितीवरून दिसून येते.