

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
सद्गुणांचा परिचय आणि त्याची ओळख होण्यासाठी सुद्धा पाठीशी किमान प्रारब्ध लागतं, बाकी कर्मफळाचा भाग तर अत्यावश्यकच. विश्वातील लाखो जीव जन्माला येतात आणि जगण्याचा, जीवनाचा अर्थ कळण्या अगोदरच ते इहलोकीचा प्रवास संपवतात. मग सद्गुण सान्निध्य मिळणार कसे? त्याचे उत्तर केवळ आणि केवळ जन्मोजन्मीच्या कर्मफळात दडलेलं आहे. मागचे जन्म तर माहीत नाहीत, पण या जन्मातले क्षण न क्षण सद्गुणासोबत जगले, त्यांना सान्निध्यात घेतले की पाठी पुण्य उभे राहण्याचा मार्ग मोकळा झालाच झाला. “अभय” या सद्गुणाचा गतलेखात मागोवा घेतला, त्यांस आपण पुढे घेऊ न जाऊ यात.
॥ श्री ॥
“अभय” हा शब्द निर्भय होण्यासाठी टाकलेलं पाऊलच नव्हे, तर अभय या शब्दात “संरक्षक कवच” उभे आहे. जगण्यातलं सामर्थ्य, जीवनातलं सामर्थ्य, शक्ती ही “अभय” या सद्गुणाच्या ठायी असते. कर्म करत जगावंच लागणार आहे. जगताना बरे-वाईट-उत्तम-अधम अनुभव येणारच आहेत. पण महत्त्वाचे हे आहे की आपण त्या अनुभवातून निर्माण होणारे “सुख-दुःख” त्यास कवटाळून बसतो. त्याला जगताना सोडता आले पाहिजे.
अनुभवातून मिळालेले जे आहे, त्यास जगताना अनुभव म्हणूनच वापरता आले पाहिजे. हेच तर आम्हाला जमत नाही. एका अनुभवातून जनमाणसाचे, नातेसंबंधियांचे, इष्ट-मित्रांचे आलेले अनुभव आपण “सुख-दुःखात” बांधून ठेवत त्यांचं “गाठोडं” जन्मभर, आयुष्यभर गाढवासारखे का वाहतोय? हेच तर आम्हाला समजत नाही. अनुभवातून ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे आणि शेवट “प्राप्त ज्ञानाला” सोडता आलं पाहिजे हेच खूप-खूप अवघड जातं पचवायला, समजून घ्यायला. संपूर्ण आयुष्यभर कर्म करत जगावच लागणार आहे, इथेच आपण हे ही लक्षात घेतलंच पाहिजे की, प्रत्येक कर्मातून “फळ” निर्माण होणारच होणार आहे.
या फळाची “आसक्ती” ठेवू नका कारण कर्म करणं शंभर टक्के आपल्याच हातातील बाब आहे, पण त्यातून मिळणारे “यश-अपयश” हेच आपल्या ठायी सुख-दुःख निर्माण करतात. खरेतर, सुख आणि दुःख या दोन्ही संकल्पना ह्या “भ्रांती” किंवा “पोकळ”. त्या स्थळ-काळ, व्यक्ती आणि विचार सापेक्ष आहेत, त्या चिरस्थायी, निरंतर तर नाहीतच नाहीत. तथापि त्या “फसव्या” आहेत. यासाठी कितीतरी उदाहरणे देता येतील. उदा :- पायी चालणारा, किमान सायकलची, सायकल चालवणारा किमान दोन चाकीची, दोनचाकीवाला, चारचाकीची, चारचाकीवाला लक्झरी चारचाकीची, इ. ही अपेक्षा- इच्छा वाढतच जाते, जाऊ नये का? नाही असे कुठे म्हटलो मी? या पाठीमागे “सुख-दुःख” या दोन्हींची जे तुम्ही-आम्ही कपोलकल्पित लेबलं लावतो, ते लावून त्याला कवटाळून जगू नका.
असेच “अभय” या सद्गुणातून शिकायचे आहे. कर्मातून निर्माण होणाऱ्या लाटा अंगावर धडकणारच !!! पण, त्यामधून निर्माण होणारे सुख-दुःख त्या क्षणापुरतेच भोगायचे आहे. त्याला कवटाळून कशाला जगताय? बस्स !!! त्यांना सोडून देऊ न पुढच्या क्षणाचा आनंद घ्या, यालाच “अभय” म्हणतात !!! हेच जगण्याचं खरं तत्त्व आणि हाच खराखुरा “ईश्वर” पाणी कधीच अशुद्ध होत नाही, तरीही आपण “अशुद्ध पाणी” असे अनेकवेळा संबोधतो.
पाणी कधीच घाणीत मिसळत नाही, फक्त घाण पाण्यासोबत चालते हे त्रिवार सत्य !! कधी, कधीच विसरू नका.! घाण पाण्यासोबत चालल्यामुळे जर सर्वात शुद्ध (पाणी म्हणजे जीवन) गोष्ट, पवित्र गोष्ट “अपवित्र” संबोधली जाऊ शकते तर तुमचे-माझं काय घेऊन बसलात? अगदी तसंच “मन” कधीच अशुद्ध किंवा अपवित्र असूच शकत नाही. मनाला चिकटलेले विचार मात्र-शुद्ध-घाणेरडे इ. असू शकतात. पण, म्हणून आपण मनाला अशुद्ध न म्हणता निर्माण झालेले विचार शुद्ध-अशुद्धतेचा विचार “बुद्धी-निकषावर” स्वीकारले पाहिजेत, हे सांगणाऱ्या गुणास “अभय” असे माऊली संबोधतात. माऊली फार सुंदरपणे या गुणावर व्यक्त होताना म्हणतात.
अगा अभय येणे नावें| बोलिजे ते हे जाणावें|
सम्यकज्ञानाचे आघवें| धावणे हे॥
कर्माविषयी, प्रत्येक कृती (विचार-आचार-अभिव्यक्ती) जी प्रत्यक्ष इंद्रियांद्वारा कृती करून, मनाद्वारा चिंतून किंवा वाचेने बोलून दाखवून आपण क्षणाक्षणाला करतो. त्याविषयीची जागृतता “अभय” या सद्गुण धारणेमधून निर्माण होते.
सद्गुणा “अभय” धारण केला, त्याचा अंगीकार करत स्वीकारला, क्षणाक्षणाला तो चित्तवृत्तीत साठवून ठेवला की, दुसऱ्या सद्गुणांकडील प्रवासास सहजगत्या सुरुवात होते. दुसरा सद्गुणाला सहजगत्या हा उपासक अभ्यासक भेटतो. तो सद्गुण म्हणजे “सत्वशुद्धी.”
सत्वशुद्धीचा परिचय माऊली फार सुंदर उदाहरणे देऊ न तुम्हा-आम्हास करून देतात. ज्याप्रमाणे “राखंडी” जळतही नाही, आणि विझतही नाही, त्याप्रमाणे ज्या बुद्धीच्या ठिकाणी संकल्प व विकल्प हे दोन्ही निर्माण होत नाहीत अशी अवस्था.
आता सत्वशुद्धी जे म्हणिजे|
ते ऐशा चिन्ही जाणिजे|
तरी जळे ना विझे| राखोंडी जैसी ॥
सद्गुणांस समोर ठेवताना “अभय” हा अग्रभागी यासाठी ठेवला आहे, जो इतर सर्व सद्गुणांचा वाटाड्या, इतर सद्गुणांचे मार्ग सोपे करणारा सहयोगी, इतर सर्व सद्गुणांच्या धारण करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करणारा सेनापती आहे.
रामकृष्ण हरी