Thane News : गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वेस्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या  Pudhari File Photo
ठाणे

Thane News : गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वेस्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार

पुढारी वृत्तसेवा

Two additional reservation windows at Thane Railway Station for Konkan Railway tickets on the occasion of Ganeshotsav

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लोखो कोकणवासीय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात.

मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत.

सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT