Malshej Kasara Ghat Safety Pudhari
ठाणे

Malshej Kasara Ghat Safety: माळशेज-कसारा घाटरस्ते बनले धोकादायक

अनेक ठिकाणी तुटलेले संरक्षक कठडे आणि डोंगरावरील धोकादायक दरडींमुळे वाहनचालकांना सतर्क राहूनच प्रवास करावा लागणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिलीप शिंदे

ठाणे: सह्याद्रीच्या भव्य रांगा, कोसळणारे धबधबे आणि दाट धुक्याची चादर यामुळे माळशेज आणि कसारा घाट परिसर पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजून जातो. पर्यटकांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हे दोन्ही घाट रस्ते खड्डेमुक्त केले आहेत; मात्र अद्यापही अनेक ठिकाणी तुटलेले संरक्षक कठडे आणि डोंगरावरील धोकादायक दरडींमुळे वाहनचालकांना सतर्क राहूनच प्रवास करावा लागणार आहे.

माळशेज घाटात ३० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित

माळशेज घाटातील ९.७ किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, पायथ्यापर्यंत चारपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. उन्हामुळे डोंगरांच्या भेगांमध्ये पाणी जाऊन दगड कोसळण्याची भीती असते.

यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३0 कोटी ३५ लाख रुपयांचा 'संरक्षक जाळी' बसवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे; मात्र तो गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या आपत्कालीन यंत्रणेसह डोंगरावरील सुट्टे दगड काढण्याचे काम सुरू आहे.

संरक्षक कठडे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट खड्डेमुक्त झाला असला, तरी येथील मुख्य समस्या कायम आहेत. घाटातील धोकादायक वृक्ष आणि दरडी काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्‍यामुळे अपघाती वळणे कायम आहेत. विविध वाहनांच्या धडकेने अनेक ठिकाणी दरीच्या बाजूचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत.

त्‍यामुळे क‍‍ठड्यांची दुरवस्था कायम आहे. प्रशासनाने तात्पुरते लावलेले सिमेंट बॅरिगेटस्‌ रात्रीच्या अंधारात किंवा दाट धुक्यात वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

प्रशासनाचे आवाहन दोन्ही घाटांमध्ये यंत्रणा तैनात असली, तरी कामांचा वेग पाहता यंदाही दरडी कोसळण्याची आणि अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांनी व वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित ठेवून अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कसारा घाटातील अतिधोकादायक ठिकाणे

जुन्या घाटात : साईबाबा खिंड, आबा पॉईंट, हिवाळा ब्रिज वळण आणि त्यापुढील २ किलोमीटरचा रस्ता.

नवीन घाटात : बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार आणि ओहळाची वाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT