Titwala Railway Encroachment Action Pudhari
ठाणे

Titwala Railway Encroachment Action: टिटवाळ्यात रेल्वेची धडक कारवाई; 19 अतिक्रमणे जमीनदोस्त

रेल्वे प्रशासनाची कारवाई; अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबविली जाणार

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : टिटवाळा परिसरातील रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर आज रेल्वे प्रशासनाने निर्णायक कारवाई करत 19 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सकाळपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

मध्य रेल्वेच्या भूमी व्यवस्थापन विभागाच्या सूचनेनुसार अप लाईनजवळील कि.मी. 63/5-18 परिसरातील रेल्वे मालकीच्या जागेवर उभारलेली कच्ची-पक्की दुकाने आणि काही निवासी बांधकामांचे भाग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधितांना यापूर्वी लेखी नोटिसा देऊन ठराविक मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने थेट पाडकामाची कारवाई हाती घेतली.

कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस दल यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरळीत पार पडली.

मधुबन सोसायटीसमोरील रेल्वे पॉवर हाऊसजवळील रस्त्यालगतचा भाग असल्याने पाडकामाची कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी रहिवाशांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या; मात्र प्रशासनाने संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण केली.रेल्वे मार्गांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.या कारवाईनंतर रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला असून, पुढील काळात अशा प्रकारांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. टिटवाळ्यातील या मोहिमेमुळे रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचा निर्धार अधोरेखित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT