टिटवाळा: गणपती विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याची घटना टिटवाळ्यात घडली.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर आणि प्रदीप भोईर, सुरेश भोईर यांच्यासह दोन्ही गटांतील सुमारे ८० साथीदारांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम श्रीकृष्णा हॉस्पिटल रोडसमोर तसेच एमएनएस चौक, स्टेशन रोड परिसरात हा प्रकार घडला.
गणपती विसर्जनासाठी मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणावरून संबंधित दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला एकमेकांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा स्वरूपाचे कृत्य झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या वाद्यवृंद वाजविण्याच्या नियमांचे उल्लंघन तसेच जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
दरम्यान, शक्तिवान भोईर आणि उपेक्षा भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता अडवण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९४, १२६, २२३ आणि ३३(१)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलिस शिपाई योगेश भोलानाथ निर्मळ यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलीअसून सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे पुढील तपास करीत आहेत. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या या वादामुळे टिटवाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून घटनेतील नेमकी पार्श्वभूमी, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि नियमभंगाच्या बाबींचा तपास केला जात आहे.