ठाणे

Thane news: 'रिल्स'च्या नादात मलंगगडच्या डोंगरात तिघे अडकले

पोलीस,अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने तिघांची सुटका; मध्यरात्री रंगला बचावकार्याचा श्री मलंगगडच्या डोंगरात थरार

पुढारी वृत्तसेवा

शुभम साळुंके

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांच्या जीवाशी खेळ करणारी धोकादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील रिल्स पाहून ट्रेकिंगचा मोह आवरता न आल्याने हे तिघेही मामा-भांजे टेकडी परिसरात गेले होते. मात्र उंच टेकडीवर चढल्यानंतर उतरताना मार्गाचा अंदाज न आल्याने ते गडावरच अडकले.होते. ही घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावरील बेफाम ट्रेंड्स पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे. त्यानंतर तातडीने मदतकार्य हाती घेत त्या तिघांची सुखरूप सुटका मध्यरात्री करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सिंग (वय २४), मंगेश प्रजापती (वय २५) आणि गुरुप्रसाद विश्वकर्मा रा. मालाड पूर्व, मुंबई हे तिघे मित्र मलंगगडावर ट्रेकिंगसाठी आले होते. इन्स्टाग्रामवरील आकर्षक रिल्स पाहून त्यांनी मामा-भांजे टेकडी गाठली होती. मात्र परतीच्या वाटेवर अंधार वाढल्याने व मार्ग धोकादायक झाल्याने ते अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस आणि अंबरनाथ अग्निशमन दल तात्काळ सतर्क झाले होते. अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखालील पथक, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गावकरी तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अवघड डोंगररांग, घसरडा मार्ग आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकाने अथक प्रयत्न करत अखेर मध्यरात्री या तिघांची सुखरूप सुटका केली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हायरल व्हिडिओंच्या आहारी जाऊन तरुण जीव धोक्यात घालत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही पर्यटक नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येत आहे. मलंगगड परिसरात अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई असताना देखील तरुण बेफिकीरपणे जीव धोक्यात घालत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT