

Jalgaon News
जळगाव: सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, भाईगिरीचे प्रदर्शन करणारे, आणि वाहतूक नियमांची ऐशीतैशी करून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या ‘रील्स बहाद्दरांना’ जळगाव पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. अशा आक्षेपार्ह आणि महिलांचा अवमान करणाऱ्या रील्सची गंभीर दखल घेत, जळगाव पोलिसांच्या सायबर सेलने मंगळवारी (७ जुलै) जिल्ह्यात ‘सायबर पॅट्रोलिंग’ची धडक मोहीम राबवली. या मोहिमेत अशा हुल्लडबाजांचा शोध घेऊन त्यांना थेट पोलीस मुख्यालयात बोलावून कायद्याचा चांगलाच डोस देण्यात आला.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. गुन्हेगारांना 'नायक' सारखे दाखवणे, घातक शस्त्रे बाळगून व्हिडिओ बनवणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर स्टंटबाजी करणे किंवा महिलांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील रील्स तयार करून ते व्हायरल करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा विकृत मानसिकतेचा समाजावर, विशेषतः शाळकरी मुलांवर आणि युवकांवर अत्यंत घातक परिणाम होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन पिढीच्या भविष्याबद्दल समाजात चिंतेचे आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वाढत्या उच्छादाला चाप लावण्यासाठी जळगाव पोलिसांनी आता डिजिटल पाऊल उचलले आहे. सायबर टीमने सोशल मीडियावरील अशा आक्षेपार्ह रील्सची बारकाईने तपासणी केली. केवळ व्हिडिओ पाहून न थांबता, पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या रील्स बनवणाऱ्यांची आणि ते प्रसारित करणाऱ्यांची अचूक ओळख पटवली. यानंतर या सर्व महाभागांना पोलीस मुख्यालयात पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे एवढाच नसून, तरूणांमध्ये कायद्याबद्दल आदर निर्माण करणे आणि त्यांना गुन्हेगारीच्या दलदलीत जाण्यापासून परावृत्त करणे हा आहे.
गुन्हेगारीचे समर्थन करणारे व्हिडिओ पाहून इतर तरुण त्याचे अनुकरण करतात. स्टंटबाजीमुळे स्वतःचा आणि निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो, तर महिलांचा अपमान करणारी सामग्री समाजातील संवेदनशीलता संपवते. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली असून, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम फत्ते करण्यात आली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली. जळगाव पोलिसांची ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून समाजविघातक संदेश पसरवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे. सोशल मीडियावर सकारात्मक, जबाबदार आणि कायदेशीर वर्तनाला प्रोत्साहन देणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सागितले.