वांगणीत राजकीय वादातून जीवघेणा हल्ला? pudhari photo
ठाणे

Thane Crime : वांगणीत राजकीय वादातून जीवघेणा हल्ला?

उपसरपंचावर कट रचल्याचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या वांगणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 एप्रिल रोजी रात्री वांगणी परिसरात रुपेश गवळी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हल्लेखोरांनी गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रुपेश गवळी आणि उपसरपंच अमित शेलार यांच्यात यापूर्वी वाद असल्याचं समोर आलं आहे. याच वादातून अमित शेलार याने कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात सराईत गुन्हेगार विवेक नायडू, श्लोक चव्हाण आणि विशाल जाधव या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर कट रचल्याचा आरोप असलेल्या अमित शेलार यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणताही व्यक्ती राजकीय पदावर असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही अशी प्रतिक्रिया बदलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.

दरम्यान, विवेक नायडू याच्यावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तर श्लोक चव्हाण याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अमित शेलार यांच्यावर यापूर्वी फसवणूक आणि महिला अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात फरार असलेल्या अमित शेलार यांना पोलीस कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT