Yavatmal Crime | प्रेमविवाहानंतर नवविवाहितेचे कथित अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा

नवदाम्पत्याच्या आयुष्यात अनपेक्षित वळण
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

यवतमाळ : नोंदणी विवाहानंतर स्वतंत्र संसाराची स्वप्ने पाहणार्‍या नवदाम्पत्याच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आले आहे. पत्नीला तिच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी घरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचा आरोप पतीने केला असून, या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पती विनीत गजानन तलमले (वय 23, रा. नेहरू नगर, घाटंजी) यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश सावरकर (मुलीचे वडील), चंदाबाई सावरकर (मुलीची आई), नीतेश सावरकर (सर्व रा. धानोरा, ता. यवतमाळ) तसेच राजू चाफले (रा. साखरा, ता. घाटंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विनीत तलमले व तृप्ती गणेश सावरकर (वय 19, रा. धानोरा) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 11 मे 2026 रोजी दोघेही घरातून निघून गेले. त्यानंतर 12 मे रोजी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या विवाहाचे प्रमाणपत्र त्यांनी घाटंजी पोलिस ठाणे तसेच वडगाव जंगल पोलिस ठाण्यात सादर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, 20 जूनला दुपारच्या सुमारास चारही आरोपी नेहरू नगर येथील विनीतच्या घरी आले. त्यावेळी घरात तृप्तीसह विनीतची आई व लहान भाऊ उपस्थित होते. आरोपींनी तृप्तीला जबरदस्तीने पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसवून सोबत नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कारच्या क्रमांक प्लेटवर टेप लावलेली होती, असाही दावा फिर्यादीने केला आहे.

घटनेनंतर विनीतने पत्नीचा शोध घेण्यासाठी तिच्या वडिलांसह इतर नातेवाइकांशी संपर्क साधला. ते तृप्तीला परत घरी आणतील, या अपेक्षेने त्याने काही दिवस प्रतीक्षाही केली. मात्र, पत्नी परत न आल्याने अखेर त्याने घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या नवविवाहित पत्नीला तिच्या आई-वडील व नातेवाइकांनी अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. तसेच स्वत:च्या जीवितालाही धोका असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी  गणेश सावरकर, चंदाबाई सावरकर, नीतेश सावरकर आणि राजू चाफले यांच्याविरुद्ध घरात जबरदस्तीने प्रवेश करून अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news