Thane News Pudhari
ठाणे

Thane Water Issue: ठाणेकरांचे हक्काचे पाणी महापालिकेनेच विकले

ठाण्याचे पाणी कमी करून मिरा-भाईंदर, भिवंडीसह विकासकांना पाणीपुरवठा; नजीब मुल्लांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीमध्ये ठाणे महापालिका 49 टक्के भागीदार असताना मागील चार वर्षात ठाणे महापालिकेचे पाणी कमी करून ठाणेकरांचेच हक्काचे पाणी ठाणे महापालिकेने विकले, असा खळबळजनक आरोप शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.

विशेष म्हणजे यासंदर्भात आपल्याकडे कागदपत्रे देखील असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला आहे. ज्यावेळी स्टेम कंपनीची स्थापना झाली त्यावेळी ठाणे महापालिकेला 127 एम एल डी पाणीपुरवठा होत होता.

मात्र हा पाणी पुरवठा वाढण्याच्या ऐवजी तो 113 एमएलडीवर आला असून ज्या महापालिकांना स्टेमने पाणीपुरवठा केला अशा महापालिकांच्या पाणीपुरवठत वाढ झाली आहे. तर विकासक आणि गोडाऊनच्या मालकांना देखील पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप मुल्ला यांनी यावेळी केला. मुल्ला यांच्या या आरोपांमुळे आता प्रशासन चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सुपर एल निनोचे येणारे संकट यावर शिवसेनेचे राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. यावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हा गंभीर आरोप ठाणे महापालिका प्रशासनावर केला.

मुल्ला यांनी या विषयावर चर्चा करताना पुढचे युद्ध हे तेलापेक्षा पाण्यावरच होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आज ठाण्यात सर्वच ठिकाणी पाणी नाही. मग हे पाणी जाते कुठे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यावेळी स्टेम कंपनीची स्थापना झाली त्यावेळी म्हणजेच 1987 साली ठाणे महापालिकेला 127 एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मिरा-भाईंदर महापालिका भिवंडी आणि भिवंडीच्या ग्रामीण भागात असा मिळून 220 एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र एवढ्या वर्षात ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा वाढण्याच्या ऐवजी तो कमी होऊन इतर महापालिकांचा पाणीपुरवठा वाढला असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी सभागृहात दिली.

गेल्या चार वर्षात ज्यावेळी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नव्हती त्यावेळी स्टेमचे हक्काचे हेच पाणी ठाणे महापालिकेने इतर महापालिका, भिवंडी ग्रामीण मधील 9 गावे तसेच विकासक आणि गोडाऊनच्या मालकांना वळवले असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

स्टेम कंपनीमध्ये ठाणे महापालिका ही 49 टक्के भागीदार असून ठाणे महापालिकेचे आयुक्त हे त्याचे अध्यक्ष असतात. मात्र असे असताना ठाण्याचे पाणी कमी करून इतरांना वळवल्याचा आरोप मुल्ला यांनी केला असल्याने यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

बांधकाम साईटवरचे पाणी थांबवा

बांधकाम साईटवर ठाणे महापालिकेचे नियंत्रण नाही, विकासकाकडून बोरिंगच्या ऐवजी टॅपिंग करून ठाणे महापालिकेचेच पाणी वापरण्यात येत आहे. जे नागरिक सध्या राहात आहेत त्यांचा आधी पाण्यावर अधिकार आहे. पाणी नसेल तर नवीन बांधकामांना पाणी न देता अशा बांधकामांचे पाणी थांबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कळव्यात, डोंगरपट्टट्टययात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

कळव्यात डोंगर पट्यात आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याचे नजीब मुल्ला यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. डोंगरावर पाण्याचे काय हाल आहेत, आठवड्या पाणी नाही, तीन, तीन ड्रम पाणी घेऊन नागरिकांना जावे लागत असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT