Thane Water Crisis Pudhari
ठाणे

Thane Water Crisis: खासगी गृहसंकुलांना पाणी देण्यासाठी पालिका घेणार भाड्याने टँकर

इमारत बांधणारे विकासक फरार, पालिकेवर कोट्यवधींचा आर्थिक भार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून ठाणे शहराबरोबरच दिव्यात असणाऱ्या अनेक मोठ्या गृहसंकुलांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.

यासाठी महापालिका भाडेतत्वावर खासगी टँकर घेणार असून या खासगी टँकरसाठी महापालिकेवर वार्षिक सव्वा कोटींपेक्षा आधीकचा बोजा पडणार आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी पटलावर ठेवण्यात आला असून या प्रस्तावावरून महासभेत मात्र चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे.

शहरात मुबलक पाणी पुरवठा असल्याचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा दावा किती पोकळ आहे, हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकर्षाने समोर आले आहे. उन्हाळाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके ठाणेकरांना बसू लागले असून अनेक खासगी गृहसंकुलांमध्ये दररोजच टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

यामुळे टँकर माफियांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील काही भागात आणि विशेष करून दिव्यात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

दिव्यात अनेक ठिकाणी मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू असून काही निर्माणाधीन आहेत तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गृहसंकुले उभी देखील राहिली आहे. मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना झाल्यानंतर या नागरिकांना पाणी देण्यास विकासक कुचकामी ठरल्याने आता ठाणे महापालिकेनेच या मोठ्या गृहसंकुलात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्णय घेतला आहे.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील गृहसंकुलांना वार्षिक 2268 खासगी टँकरच्या फेऱ्या करून हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर ठाणे शहरातील माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कोपरी वागळे, इस्टेट अशा काही भागात देखील खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

दिव्यासाठी 24 लाख 94 हजार तर ठाणे शहरातील विविध भागासाठी 80 लाखांची तरतूद खासगी टँकर भाड्याने घेण्यासाठी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून या मुद्द्यावरून सभागृहात मात्र गदारोळ होण्याची शक्यता आहे.

...तर बांधकाम परवाने थांबवा

एखाद्या विकासाला बांधकाम परवानगी देताना तो विकासक पाण्याची सुविधा देण्यास सक्षम आहे, हे तपासल्यानंतरच बांधकाम परवानगी देण्यात येते. मात्र शहर विकास विभागाने सरसकट बांधकाम परवानगी कोणत्या आधारे या विकासकांना दिली आहे, आणि नागरिकांना पाणी न देताच वाऱ्यावर सोडणाऱ्या विकासकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ठाणे शहरात पाणी समस्या गंभीर आहेच, मात्र याला ठाणे महापालिकेचे नियोजन देखील तितकेच जबाबदार आहे. पाणी गळती, पाणी चोरीचा प्रश्न महापालिकेला सोडवता आलेला नाही. दुसरीकडे बांधकाम परवानगी देताना पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून संबंधित गृहसंकुलांना आपण पाणी देऊ शकतो याची खात्री करूनच परवानगी देणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व विभागांचा समन्वय असणे फार आवश्यक आहे.
- मंदार केणी, नगरसेवक, ठा.म.पा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT