ठाणे : माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये प्रभाग तीनमध्ये संध्याकाळी राडा झाला. ब्राम्हंड येथील सेंट झेवियर्स येथील मतदान केंद्राबाहेर ईव्हीएम मशीन पळवून नेण्यावरून राडा झाला. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला.
भूषण भोईर यांनी बाहेरून लोक तसेच हत्यारे आणून कोणाला तरी जिवे मारण्याचा कट होता असा आरोप माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे, तर मीनाक्षी शिंदे समर्थकांकडून भूषण भोईर यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली असल्याचा आरोप भूषण भोईर समर्थकांकडून करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचे पॅनल विरोधात आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भूषण भोईर मतदान केंद्रात का आले यावरून हा वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे समर्थक मोठया प्रमाणात बाहेर जमा झाले. यावेळी काही वाहने फोडण्याचा देखील प्रयत्न कारण्यात आला. प्रकरण आणखी वाढू नये यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी बोलावून या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला.