ठाणे : तब्बल सहा वर्षानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र महासभा अस्तित्वात नसल्याने यावर्षी मॅरेथॉनचे हे शिवधनुष्य प्रशासनालाच पेलावे लागणार आहे.
गेले अनेक वर्ष ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असे नाव असलेल्या या मॅरेथॉनवरील राजकीय पगडा सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी, मॅरथॉनच्या तयारीमध्ये प्रशासनाबरोबर शिंदेच्या शिवसेनेही आघाडी घेतली आहे. स्पर्धेच्या आयोजनाच्या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात बैठक झाली असल्याचे खात्रीलायक माहिती असून या बैठकीमुळे ठाणे वर्षा मॅरेथॉन प्रशासनाच्या वतीने हायजॅक करण्यात आली कि काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात आली नव्हती. मात्र आता 10 ऑगस्ट रोजी वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. महासभा अस्तित्वात नसल्याने यावर्षी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असे नाव ठेवता केवळ वर्षा मॅरेथान असे नामकरण या स्पर्धेचे करण्यात आले आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ही स्पर्धा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशच्या सूचनेनुसार, एकूण 10 लाख 38,900 रुपयांची पारितोषिके,चषक व पदके असतील. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक आहे. तर, प्रत्येक गटात प्रथम 10 विजेत्यांना पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्याने महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही. त्यामुळे वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे.
सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्पर्धेच्या प्रयोजकत्वासाठी पालिका अधिकार्यांची सध्या धावाधाव सुरु आहे. आतापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेही उडी घेतली असून यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात एक महत्वाची बैठक झाली असून मॅरेथानचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनाच घेत होते. त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा. स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा. यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. ते शिवसैनिकच असल्याने यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळत आहे. त्यामुळे हायजॅक होण्याचा काहीही संबंध नाही.नरेश म्हस्के, खासदार, ठाणे लोकसभा
येत्या 10 ऑगस्ट रोजी ठाणे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याने अवघे काही दिवसच या स्पर्धेसाठी शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या रूटवर स्पर्धक धावणार आहेत त्या रूटची पाहणी देखील करण्यात आली आहे.