

उल्हासनगर : गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'माय अर्बन नागरी सहकारी पतपेढी'च्या अध्यक्षांसह नऊ संचालकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथील रहिवासी असलेले इलेक्ट्रीशियन कॉन्ट्रॅक्टर गोपाल रामचंद्र रख्यानी(वय ५३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह अन्य तीन गुंतवणूकदारांचे मिळून एकूण 1 कोटी 5 लाख 95 हजार 459 (एक कोटी पाच लाख पंचाण्णव हजार चारशे एकोणपन्नास) रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 8 ऑक्टोबर 2018 पासून माय अर्बन पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण प्रकाश दर्याणी आणि अन्य संचालकांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले.
गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादी गोपाल रख्यानी यांच्याकडून 73 लाख 31 हजार 459 रुपये आणि इतर तीन गुंतवणूकदारांकडून 32 लाख 64 हजार 000 रुपये जमा केले. गुंतवणुकीची रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा, व्याज किंवा लाभांश दिला नाही. वारंवार मागणी करूनही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. जेव्हा गोपाल रख्यानी यांनी आपल्या पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा आरोपींनी उलट त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.
या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण दर्याणी यांच्यासह सचिव अशोक हरचंदानी, खजिनदार नियाती दर्याणी आणि इतर सहा संचालक- प्रकाश दर्याणी, नयना दर्याणी, मेहेमोश छायेला, हरीराम खेतवाणी, पुजेश गोंदाने आणि भास्कर लांगे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (318(4), 316(2), इत्यादी) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (1999) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.