

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या सोईसुविधेकरीता सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. या शौचालयांच्या देखभाल, दुरुस्तीचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदाराने शौचालयात येणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पाणी देण्यास नकार दिल्याचे वृत्त दैनिक पुढारीने १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होते. त्याची गंभीर दखल घेत उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केल्याची नोटीस ठेकेदाराला जारी केली आहे.
पालिकेने भाईंदर पश्चिमेकडील गणेश देवल नगर, जय अंबे नगर, नेहरु नगर, शास्त्री नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आदी झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. या सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन साफसफाई, निगा, देखभाल व दुरुस्ती बाबतचा ठेका पालिकेने पुण्याच्या मेसर्स सुमित फॅसिलिटीज लि. या कंपनीला १५ मार्च २०२४ रोजी देण्यात आला आहे.
या शौचालयात शौचासाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांना ठेकेदाराकडून मोफत पाणी उपलब्ध करून देणे, ठेकेदाराला करारातील अटी-शर्तीनुसार बंधनकारक असतानाही ठेकेदाराकडून रहिवाशांना पाणी देण्यास नकार दिला जात होता. यामुळे स्थानिकांना घरूनच पाणी आणावे लागत होते. त्यात महिलांची मोठी कुचंबना होत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत बातमीच्या अनुषंगाने पालिकेचे स्वच्छता निरिक्षक रविंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन वृत्ताची शहानिशा केली. त्यावेळी ठेकेदार स्थानिक रहिवाशांना स्वतः पाणी आणण्यास सांगत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले.
ठेकेदाराच्या या वागणुकीमुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पाटील यांच्याकडे करण्यात आल्या. यामुळे ठेकेदाराकडून करारनाम्यातील अटी-शर्तीचे उल्लंघन करून त्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी ठेकेदारावर त्याच्या मासिक देयकातील रक्कमेवर ५ टक्के दंडात्मक कारवाई केल्याची नोटीस ठेकेदाराला बजाविली आहे.
लोकांच्या तक्रारीला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे वृत्त दैनिक पुढारीकडून प्रसिद्ध करण्यात आले. त्याबद्दल दैनिक पुढारीचे आभार.
अॅड. रवि व्यास, माजी जिल्हाध्यक्ष (मिरा-भाईंदर भाजप)