डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराने मोबाईल चोरताना एका तरूणाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या तरूणाला मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याने आयुष्य भराचा फटका बसला आहे.
तपोवन एक्स्प्रेसने निघालेले तरूण शेतकरी गौरव रामदास निकम शहाड ते आंबिवली दरम्यान एक्स्प्रेसच्या दारात फोनवर बोलत असताना एक्स्प्रेस धीम्या गतीने चालली होती. याचा फायदा घेत अल्पवयीन मोबाइल चोराने हाताला फटका मारत मोबाईल खेचला. याच दरम्यान गौरव एक्स्प्रेसमधून पडल्याने चाकाखाली आल्याने त्याला एक पाय गमवावा लागला आहे.
या तरूणाच्या दुसऱ्या पायलाही गंभीर दुखापत झाली आहे. या अमानुष घटनेत चोरट्याने जखमी अवस्थेत असलेल्या प्रवाशाजवळील रोख रक्कमेसह सर्व ऐवज लुटून पळ काढला. हा तर माणुसकीला काळ फासण्याचा प्रकार असल्याचे दिसून आले आहे. या घटनेचे गंभीर्य पाहता रेल्वे प्रवाशी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी जखमी तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच काही तासातच अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यावर अटकेची कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास कांदे यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या या चोरट्यावर यापूर्वी देखिल अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
लोहमार्ग पोलिस या संदर्भात चौकस तपास करत आहेत. तर दुसरीकडे या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोबाईल लांबविणारे चोरटे दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या बेसावध प्रवाशांच्या हातावर फटका मारतात. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लांबविणाऱ्या फटका गँगचा फटका हा अनेक प्रवाशांना बसून नाहक बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. लोहमार्ग पोलिसांना यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गौरव हा मूळचा नाशिकचा असून तो ठाण्याहून नाशिकला रेल्वे ट्रेनने प्रवास करत होता. तर अटक केलेला अल्पवयीन चोरटा हा आंबिवलीतील इराणी पाड्यात राहतो. गौरव ट्रेनमधून पडल्यावर गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्या चोरट्याने अशा स्थितीतही गौरवच्या खिशातील 20 हजार रुपये काढून पळ काढला.