

डोंबिवली : डोबिवलीच्या गजबजणार्या रस्त्यावर कोयताधारी तडीपार कुख्यात गुंडाला क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. अर्धा तास पोलीस आणि या कोयताधारी गुंडात धुमश्चक्री सुरू होती.
विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी ठाणे, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार केलेला श्रीराम शांताराम राठोड (25) हा डोंबिवली जवळच्या पिसवली गावातील कुख्यात गुंड पोलिसांची नजर चुकवून डोंबिवलीत दाखल झाला होता. तो हातात कोयता घेऊन टाटा पॉवर ते छत्रपती शिवाजी महाराज चौका दरम्यान रस्त्यावर वाहनचालकांसह पादचार्यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत होता. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने या गुंडाला कोयत्यासह रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या. यावेळी जवळपास अर्धा तास पोलीस आणि गुंडामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. अखेर या गुंडाच्या मुसक्या आवळण्यात क्राईम ब्रँचला यश आले.
कल्याण-शिळ महामार्गावरील पिसवली गाव परिसरासह टाटा पॉवर भागात राठोड याची शस्त्राच्या जोरावर प्रचंड दहशत होती. त्याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका होती. परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि दुकानदार त्रस्त झाले होते. स्थानिक पोलिसांनी त्याच्या तडीपारचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. या अहवालावरून विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी त्याला 5 डिसेंबर 2024 पासून ठाणे, मुंबई, उपनगरे, रायगड जिल्ह्यातून त्याला हद्दपार केले होते. तरीही पोलिसांची नजर चुकवून घराच्या परिसरात चोरी-छुपे वावरत होता.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याने कहर केला. धारदार कोयता हातात घेऊन बाहेर पडलेला हा गुंड डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर फिरून सर्वांना धाक दाखवत त्यांच्या अंगावर धाऊ लागला. चालकांना धमकावू लागला. ही माहिती खासगी गुप्तहेरांकडून मिळताच व.पो.नि. अजित शिंदे यांनी पथकाला घटनास्थळी जाण्याच्या सूचना देत मोठ्या कौशल्याने या गुंडाला जेरबंद करण्यात यश मिळविले.