ठाणे: पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर येथे स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना कळव्यात सोमवारी सकाळी स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कळव्यातील विक्रांत सोसायटी येथील पहिला मजल्यावरचा स्लॅब कोसळल्याने ३ जण जखमी झाले. विक्रांत या ३८ वर्षे जुन्या इमारतीमधील पहिला मजल्यावरचा स्लॅब तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये पडला. या घटनेत आयुष जानू धामने (वय २०) आणि कादिर सलमानी (वय १९) तसेच सलून मध्ये केस कापण्यासाठी आलेला पार्थ निलेश पाटकर (वय१६) हे तिघे जखमी झाले. त्या तिघांना कळव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या हाताला, डोळ्याला, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.
कळवा, मनिषानगर येथील या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०६ हे गणेश जानू धामणे यांच्या मालकीची आहे. त्याच खोलीचा स्लॅब तळ मल्यावरती असलेल्या मे. ग्लोबल ब्युटी सलूनमध्ये पडला. हे सलून हरून सलमानी हकीम यांच्या मालकीचे आहे.
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी व जवान तसेच कळवा पोलीस, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, कळवा प्रभाग समिती सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी धाव घेतली. या घटनेत आयुष जानू धामने याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून सलून मध्ये काम करणारा कादिर सलमानी याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच केस कापण्यासाठी आलेला १६ वर्षीय पार्थ निलेश पाटेकर हा जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना कळव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.
सहा दुकानांसह प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी सहा – सहा रूम आहेत. असे २४ रूम आणि सहा दुकाने आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून उप-आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार त्या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेला रूम बंद करण्यात आला आहे. संपूर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर इमारत सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
हेही वाचलंत का ?