Thane Shiv Sena Pudhari
ठाणे

Thane Shiv Sena: ठाणे शिवसेनेत मतभेद चव्हाट्यावर? सरनाईक-जगदाळे यांच्यात क्लस्टर, एसआरए अन् रिंग मेट्रोवरून वेगवेगळ्या भूमिका

लोकमान्यनगर-शास्त्रीनगर क्लस्टरच्या निर्धार मेळाव्याने चर्चेला उधाण; एसआरए आणि मेट्रोच्या भूमिकांवरूनही वेगवेगळे सूर

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण सोनावणे

ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यातील छुपा संघर्ष लपून राहिलेला नाही. मात्र आता हा संघर्ष आणखी उफाळून आला असून याला निमित्त ठरले ते काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थिती झालेली ठाण्यातील एस आर ए प्रकल्पाच्या संदर्भातील बैठक आणि त्यानंतर नुकताच रविवारी झालेला हणमंत जगदाळे यांचा जाहीर निर्धार मेळावा.

एस आर ए च्या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी जगदाळे यांचे नाव न घेता एस आर ए प्रकल्प राखडवणऱ्या विकासकांना नोटीस द्या असे आदेश प्रशासनाला दिले. तर जगदाळे यांनी क्लस्टरसाठी घेण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये मंत्री सरनाईक यांचे नाव न घेता क्लस्टर बाबत संभ्रम पसरवणाऱ्याना थेट इशाराच दिला.

रिंग मेट्रोचा मार्ग बदलण्यावरूनही जगदाळे यांनी थेट नाव न घेता परिवहन मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. विशेष म्हणजे जगदाळे यांनी क्लस्टरसाठी घेतलेल्या जाहीर मेळाव्यामध्ये विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत शिवसनेच्या नगरसेवकांचा एक गट देखील दिसून आला , त्यामुळे शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेच्याच नगरसेवकांचा एक गट सक्रिय झाला असल्याचे सध्या ठाण्याच्या राजकारणात मोठी चर्चा आहे.

लोकमान्य शास्त्रीनगर हा परिसरात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात येत असून या ठिकाणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांची ताकद देखील मोठी आहे , त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र झाला तर शिवसेनेतील हा अंतर्गत कलह मिटविण्याचे मोठे आव्हान वरिष्ठ नेत्यांवर आहे .

ठाण्याच्या राजकारणात सत्ताधारी शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता हळूहळू उघड होऊ लागले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यातील मतभेद क्लस्टर, एसआरए आणि रिंग मेट्रो या तीन महत्त्वाच्या प्रश्नांवरून राजकीय चर्चेचा विषय बनले आहेत.

विशेष म्हणजे, या संघर्षात आता केवळ दोन नेत्यांच्या भूमिकांचा प्रश्न न राहता, शिवसेनेच्या नगरसेवकांचा एक गट देखील यामध्ये सहभागी झाला असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहता या संघर्षाला तीन प्रमुख मुद्द्यांची पार्श्वभूमी आहे.

एसआरए प्रकल्पांवरील आढावा बैठकीत मंत्री सरनाईक यांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित विकासकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर लोकमान्यनगर-शास्त्रीनगर येथील क्लस्टरच्या प्रश्नावर हणमंत जगदाळे यांनी घेतलेल्या निर्धार मेळाव्याने या संघर्षाला राजकीय रंग दिला.

क्लस्टरबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत जगदाळे यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन, करार आणि पर्यायी व्यवस्था स्पष्ट करूनच पुनर्विकास पुढे नेण्याची भूमिका मांडली. या मेळाव्याला शिवसेनेतील काही नगरसेवकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक राजकारणात या मेळाव्याची राजकीय चर्चा होणे स्वाभाविक ठरले.

यामुळे लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरात क्लस्टर आणि रिंग मेट्रो वरून सुरु झालेला संघर्ष आता शिवसेनेतील स्थानिक राजकीय समीकरणांची कसोटी ठरणारा भाग बनला आहे. एकीकडे सरनाईक हे या मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि मंत्री आहेत; तर दुसरीकडे जगदाळे यांचे स्थानिक संघटन आणि नगरसेवक म्हणून दीर्घकाळातील राजकीय अस्तित्व दुर्लक्षित करता येणार नाही.

वरिष्ठ नेतृत्वासमोर समन्वयाचे आव्हान

ठाणे हे शिवसेनेच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मतभेद दीर्घकाळ सार्वजनिक राहिल्यास त्याचा परिणाम संघटनात्मक पातळीवर होऊ शकतो. क्लस्टर आणि एसआरए यांसारखे नागरिकांच्या घरांशी संबंधित प्रश्न तसेच रिंग मेट्रोसारखा मोठा पायाभूत प्रकल्प यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिका वेगळ्या असणे स्वाभाविक असले, तरी त्यातून पक्षांतर्गत संघर्षाची प्रतिमा निर्माण होणे हे वरिष्ठ नेतृत्वासाठी चिंतेचे कारण ठरू शकते.

सध्या तरी सरनाईक आणि जगदाळे यांच्यातील मतभेद वैयक्तिक संघर्षापेक्षा विविध विकासप्रकल्पांवरील भूमिकांच्या फरकातून दिसत आहेत. मात्र क्लस्टरचा पुढील टप्पा, रिंग मेट्रोचा मार्ग आणि रखडलेल्या एसआरए प्रकल्पांवर होणारे निर्णय यामुळे हा संघर्ष कोणत्या दिशेने जातो, हे ठरणार आहे.

ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेसमोर त्यामुळे एकीकडे विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील विविध नेत्यांच्या भूमिकांमध्ये समन्वय राखण्याचेही आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळात क्लस्टरचा प्रश्न हा केवळ पुनर्विकासाचा मुद्दा न राहता ठाण्यातील शिवसेनेतील स्थानिक राजकीय समीकरणांचीही परीक्षा घेणारा ठरू शकतो.

रिंग मेट्रोने मतभेदांना दुसरा आयाम

या दोन नेत्यांमधील मतभेद केवळ पुनर्विकासाच्या प्रश्नापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. लोकमान्यनगर परिसरातून प्रस्तावित रिंग मेट्रोच्या मार्गावरूनही दोन्ही बाजूंच्या भूमिका वेगळ्या असल्याचे समोर आले आहे.

सरनाईक यांनी पर्यायी मार्गाचा आग्रह धरला, तर जगदाळे यांच्यासह काही स्थानिक नगरसेवकांनी मूळ मार्ग कायम ठेवण्याची भूमिका घेतली. याच मुद्द्यावर नागरिकांनी मानवी साखळी आंदोलनही केले.

क्लस्टर ठरणार राजकीय शक्तिप्रदर्शन...

लोकमान्यनगर-शास्त्रीनगरमधील क्लस्टरचा प्रश्न हा हजारो नागरिकांच्या पुनर्विकासाशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नावर कोणाची भूमिका नागरिकांमध्ये अधिक स्वीकारली जाते, यालाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जगदाळे यांच्या मेळाव्यात शिवसेनेतील नगरसेवकांची उपस्थिती ही त्यामुळेच चर्चेचा विषय ठरली आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ अशा स्वरूपाचे चित्र निर्माण झाले .मात्र या उपस्थितीचा अर्थ थेट पक्षांतर्गत बंड किंवा गटबाजी असा काढणे घाईचे ठरेल. स्थानिक नगरसेवक एखाद्या विकासकामाच्या किंवा मतदारांच्या प्रश्नाच्या भूमिकेला पाठिंबा देत असू शकतात. तरीही एकाच पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या भूमिकांमध्ये सार्वजनिक मतभेद दिसू लागल्याने त्याचा राजकीय संदेश नक्कीच महत्त्वाचा ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT