India China Exports: चीनच्या बाजारात ‘मेड इन इंडिया’चा दबदबा; भारतीय मालाची मागणी ४० टक्क्यांनी वाढली

वाहनांचे सुटे भाग आणि शेतीच्या अवजारांना चीनची पसंती
India China Exports
India China ExportsPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: जगाचे उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या बाजारपेठेत आता ‘मेड इन इंडिया’ची धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. ज्या चीनकडून भारत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घटक आयात करतो, त्याच चीनच्या बाजारात आता भारतीय मालाची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे.

इलेक्ट्रॉनिक घटक, यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग आणि शेतीची अवजारे यांना चीनकडून चांगली पसंती मिळत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत चीनला भारताची निर्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढून ९.६१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यामुळे चीनच्या बाजारात भारतीय उत्पादनांचा दबदबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

चीनमधील कंपन्या आता कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार उपकरणे आणि एआय सर्व्हर यासारख्या उच्च मूल्याच्या उत्पादनांवर जोर देत आहेत. त्यामुळे तुलनेने साधे इलेक्ट्रॉनिक घटक आणि उपघटक बाहेरून घेण्याची गरज वाढत आहे. याच बदलाचा थेट फायदा भारतीय उत्पादकांना मिळताना दिसत आहे.

India China Exports
Bullet Train Steel Bridge: बुलेट ट्रेनच्या कामाला मोठी गती! महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल भिवंडीत; १,४०५ टन वजनाची रचना

भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा विस्तार, मोबाईलनिर्मितीचा अनुभव आणि घटक उत्पादनासाठी होणारी मोठी गुंतवणूक यामुळे भारतीय कंपन्या चीनच्या उत्पादन साखळीत दमदार पाऊल टाकत आहेत.

भारतानेही आता केवळ मोबाईल जोडणीपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता इलेक्ट्रॉनिक घटक, उपघटक, साहित्य आणि उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करण्यावर भर दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक घटकनिर्मिती योजनेची तरतूद २२ हजार ९१९ कोटींवरून ४० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

या वाढीला खरा ‘बूस्टर डोस’ मिळाला तो इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीमुळे. विशेषतः, ‘पीसीबीए’च्या निर्यातीने भारताची बदलती उत्पादन क्षमता अक्षरशः जगासमोर आणली आहे. २०२४-२५ मध्ये भारताने चीनला अवघ्या ३६ दशलक्ष डॉलर्स किमतीचे ‘पीसीबीए’ पाठवले होते.

India China Exports
Vadhavan Port Protest: वाढवण बंदराविरोधात मोठा आंदोलनाचा इशारा! २ ऑक्टोबरला ‘सविनय कायदेभंग’ करण्याचा निर्धार

मात्र, २०२५-२६ मध्ये हीच निर्यात थेट १.५ अब्ज डॉलर्सवर झेपावली. म्हणजेच, अवघ्या एका वर्षात ‘पीसीबीए’ निर्यातीत ४० पटींहून अधिक भक्कम वाढ झाली. भारताच्या एकूण ‘पीसीबीए’ निर्यातीपैकी जवळपास ८० टक्के माल चीनमध्ये गेला. त्यामुळे पुणे, चेन्‍नई, नोएडा, बंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद यासारख्या प्रमुख औद्योगिक शहरांमधील इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी आणि वाहन उद्योगांसाठी ही वाढती मागणी म्हणजे दसरा-दिवाळीच ठरणार आहे.

महाराष्ट्रात पुणे-चाकण-तळेगाव, पिंपरी-चिंचवड, रांजणगाव आणि खेड हा पट्टा इलेक्ट्रॉनिक्स, वाहन घटक आणि अभियांत्रिकी उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरत आहे. विशेषतः, तळेगाव आणि खेड ही इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली व उत्पादन क्षेत्रातील विकसित केंद्रे असून रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन हब उभारण्यात आला आहे.

पुणे परिसरातील वाहन व सुटे भाग उद्योगाची मोठी व्याप्ती असल्याने चीनमधून वाढणाऱ्या मागणीचा परिणाम स्थानिक पुरवठादार, लघू-मध्यम उद्योग आणि घटक उत्पादकांपर्यंत पोहोचू शकतो.

महाराष्ट्रातील मुंबई-ठाणे-रायगड पट्ट्यात अभियांत्रिकी, वाहन घटक, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांचे मोठे जाळे आहे तर तळोजा आणि नवी मुंबई परिसरात औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे चीनची मागणी केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित न राहता ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, कोल्‍हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक पुरवठा साखळीलाही ‘बूस्टर डोस’ मिळणार आहे.

‘पीसीबीए’ म्हणजे काय?

‘पीसीबीए’ म्हणजे सोप्या भाषेत, मोबाईल, संगणक, दूरसंचार उपकरणे, टीव्ही, वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा यामध्ये जी हिरवी/निळी सर्किट बोर्डची प्लेट असते, त्यावर चिप, रेझिस्टर, कपॅसिटर, कनेक्टर आदी घटक बसवले की, ते ‘पीसीबीए’ बनते.

निर्यातवाढीचा फायदा कोणाला?

या निर्यातवाढीचा फायदा एकाच क्षेत्राला नव्हे तर उत्पादन क्षेत्राच्या मोठ्या पट्ट्याला होऊ शकतो. सर्वाधिक थेट फायदा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकनिर्मितीला होईल; ‘पीसीबीए’, दूरसंचार उपकरणे, मोबाईलचे घटक, डिस्प्ले मॉड्यूल यांची मागणी वाढल्यास देशातील कारखाने आणि पुरवठादारांना नवी ऑर्डर मिळू शकते.

त्यानंतर यंत्रसामग्री व अभियांत्रिकी उद्योग, वाहनांचे सुटे भाग, शेतीची अवजारे, विद्युत उपकरणे, धातू प्रक्रिया आणि लघू-मध्यम उद्योगांना चीनची मोठी बाजारपेठ खुली होऊ शकते.

भारताची चीनला होणारी निर्यात वाढली असून त्यात आणखी विस्ताराची मोठी क्षमता आहे. भारतीय वस्तू आणि सेवांना चीनच्या बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळणे आवश्यक आहे. दोन्ही देशांनी व्यापारातील संरचनात्मक असमतोल आणि पुरवठा साखळीशी संबंधित प्रश्नांवर काम करून अधिक संतुलित आणि शाश्वत व्यापार संबंध निर्माण करण्याची गरज आहे.

- राजेश अग्रवाल, सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

एआयशी संबंधित उत्पादनांसाठी आवश्यक उच्च क्षमतेच्या उपकरणांची मागणी आणि जगभरात डेटा सेंटरची वाढ यामुळे इलेक्ट्रॉनिक्स पुरवठादारांवर दबाव वाढला आहे. त्यातून भारतातून चीनला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीला चालना मिळाली आहे.

- राजू गोयल, महासचिव, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news