ठाणे : ठाण्यात भाजपा आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
ठाणे हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच प्रताप सरनाईक यांनाही यावेळी मंत्रीपद देण्यात आले. तर भाजपने एकमेव गणेश नाईक यांना मंत्रीपद दिले आहे. मात्र सध्या शिंदे विरुद्ध नाईक असे वाक् युद्ध रंगताना दिसत आहे. नाईक यांचे ठाण्यातील जनता दरबार रंगल्यानंतर शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार सुरू केले. तर खा. नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत जनता दरबार सुरू केले. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये दरी वाढू लागली असताना स्वबळाचे संकेतही मिळू लागले आहेत.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर या सहा महापालिका आहेत. ठाण्यावर शिवसेनेने लक्ष्य केंद्रित केले आहे. तर दुसर्या बाजूला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपसाठी तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईवर गणेश नाईक यांचे प्राबल्य आहे. तर मीरा भाईंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी कंबर कसली आहे. कल्याण-डोंबिवली हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होम पीच आहे. तर उल्ल्हासनगरला भाजपा आमदार आहेत.
या पार्श्वभूमिवर भाजपाने या सर्व महापालिकेत सत्ता आणण्याचा प्रयत्न सुरू केला, तर दुसर्या बाजूला शिवसेनेने ठाण्याची जबाबदारी नरेश म्हस्के यांच्यावर, कल्याण डोंबिवलीसाठी स्वत: श्रीकांत शिंदे मैदानात आहेत. मीरा भाईंदरवर मंत्री प्रताप सरनाईक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही या सर्व महापालिकेत आपल्या पक्षासाठी व्युहरचना सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेत भाजपाप्रमाणे शिवसेना शिंदे गटालाही महायुतीमध्ये निवडणूक लढवायची आहे. त्यात कुठलेही मतभेद नाही. मात्र ठाणे आणि पुणे जिल्ह्यात राजकीय चित्र वेगळे आहे. ठाण्यात दुभंगलेल्या शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद अधिक असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शक्तिशाली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जाणार असताना ठराविक ठिकाणी मैत्रीपूर्वक लढतीचा आग्रह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून धरला जात आहे. त्यानुसार मुंबईत महायुती आणि ठाण्यात राष्ट्रवादी आणि भाजप तर पुण्यात भाजप आणि शिवसेना अशी युती असेल.
ठाण्यात शिवसेना स्वतंत्र तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकतात, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार ठाणे, नवी मुंबईत, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना असा सामना होईल. ठाण्यात सर्वाधिक 84 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे असून भाजपकडे 23 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. त्यामुळे जागा वाटपात भाजपच्या वहाती फार काही लागणार नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे मतदार वाढल्याचा दावा करीत भाजपचे मंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांनी स्वबळाची मागणी लावून धरली आहे. ठाण्याप्रमाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यादा पॅनल पद्धतीने निवडणुका होत असून मागील निवडणूकही स्वतंत्रपणे लढली गेली होती. निवडणुकीनंतर युती झाली. तोच फॉर्मुला कल्याणात राबविण्याचा आग्रह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आहे. त्याचा परिणाम पक्ष वाढेल आणि नाराज कार्यकर्ते आणि मतदार अन्य पक्षांकडे जाणार नाहीत, असा युक्तिवाद मांडला जात आहे.