मुंबई : मुंबई रेबीज निर्मूलन मोहीम हा मुंबई महानगरपालिका व मिशन रेबीज यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे. 2030 पर्यंत मुंबईला रेबीजमुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा संकल्प असून या निमित्ताने जनजागृती मोहिम, आरोग्य शिक्षण सत्रे आणि लसीकरण मोहिमा राबविण्यात येत आहेत. 2023 पासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी जीपीएस ट्रॅकिंग व डब्लूव्हीएस अॅपसारख्या डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे.
लसीकरण सुविधेसाठी 163 आरोग्य संस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे सेवेत आहेत. रेबीज आजार हा झूनॉटिक आजारांपैकी एक असून सर्वसामान्यतः श्वानामार्फत हा आजार संक्रमित होतो. रेबीज आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार 100 टक्के टाळता येतोे.
दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी वर्ल्ड रेबीज डे साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबीजविषयी जनजागृती करणे आणि वन हेल्थ दृष्टिकोनातून या रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करणे, असे आहे. तसेच सामूहिक प्रयत्नांमुळे सन 2030 पर्यंत रेबीजमुळे होणार्या मानवी मृत्यूचे निर्मूलन साध्य होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 2024 मध्ये श्वानाने चावा घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 1,00,000 दरम्यान आहे.
महापालिकेतील रेबीजसंबंधी सुविधा
एकूण कार्यरत अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे :163
एआरव्ही लस व इम्युनोग्लोब्युलिन महानगरपालिकेत उपलब्ध आहे.
रेबीज रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे.