ठाणे: ठाणे शहरातील पाचपाखाडी, नितीन कंपनी, कामगार हॉस्पिटल आणि घोडबंदर रोडवर शेअर रिक्षाचालकांनी अचानक केलेल्या भाडेविरोधात भाजपच्या आमदार ॲड. माधवी संजय नाईक यांनी आवाज उठविला आहे.
या प्रकरणी त्यांनी `आरटीओ'कडे तक्रार केल्यानंतर प्रवाशांची दररोज ५ ते १० रुपयांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात भरारी पथकाच्या साह्याने कारवाई केली जाणार आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूकडून शहरातील अनेक मार्गावर शेअर रिक्षा धावतात. गावदेवी मंदिराजवळून पाचपाखाडी, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार हॉस्पिटल आणि घोडबंदर रोड मार्गावर शेअर रिक्षा धावतात. या मार्गावर प्रति प्रवासी सरसकट ५ ते १० रुपये जादा आकारण्यात येत आहेत.
गावदेवी ते पाचपाखाडी, गावदेवी ते नितीन कंपनीपर्यंत प्रति प्रवासी २० रुपये, गावदेवी ते ज्ञानेश्वरनगर आणि गावदेवी ते कामगार हॉस्पिटलपर्यंत प्रति प्रवासी २५ रुपये आकारले जात आहेत. तसेच ठाणे स्टेशन ते हिरानंदानी इस्टेटपर्यंत ५० रुपये, कासारवडवलीपर्यंत ६० रुपये आकारण्यात येत आहेत.
एकतर्फी झालेल्या या भाडेवाढीचा दररोज हजारो प्रवाशांना फटका बसत आहे. विशेषत: कामगार हॉस्पिटल, ज्ञानेश्वर नगर भागात सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. त्यांना दररोजचा आर्थिक भुर्दंड परवडणारा नाही, याकडे आ. ॲड. माधवी नाईक यांनी लक्ष वेधले. घोडबंदर रोडवरील प्रवाशी वाहतूककोंडीने त्रस्त असतानाच, त्यांना शेअर रिक्षा भाडेवाढीचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर आ. ॲड. माधवी नाईक यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची भेट घेतली. तसेच शेअर रिक्षा भाडेवाढीविरोधात कारवाईची मागणी केली.
दिवाळीत प्रवाशांना जादा दरवाढ
गावदेवी मंदिराजवळ काही रिक्षाचालकांकडून `गावदेवी शेअर रिक्षा संघर्ष समिती'च्या नावाने बेकायदा भाडेवाढीचा फलक झळकविण्यात आला आहे. नितीन कंपनी नाक्यावरही बेकायदा फलक झळकविण्यात आला.
त्यानंतर रिक्षाचालकांनी परस्पर वसुलीला सुरुवात केली. यापूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक शेअर रिक्षाचालकांकडून परस्पर जादा भाडे वसूल केले जात होते. दिवाळीच्या काळातही प्रवाशांना जादा दरवाढीचा फटका बसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रीपेड रिक्षा सुविधेचा वापर करा...
आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून बेकायदा भाडेआकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच रिक्षाचालकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे