Thane sewage treatment project Pudhari
ठाणे

Thane sewage treatment project: कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्प ठरला पांढरा हत्ती! उत्पन्न शून्य, खर्च मात्र वर्षाला 10 कोटींवर

महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला एक रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

ठाणे पूर्वेत कन्हैय्या नगरलगत ठाणे महापालिकेने पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार ए.के. इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त पाच एमएलडी शुद्ध पाणी तयार करण्यात आले आहे.

सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणारे शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावे, असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाहीच, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेलाच दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. याबाबत बोलताना केळकर म्हणाले, या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

या प्रकरणी केंद्र सरकारने 90 कोटींचा दंडही ठोठावला आहे तर घेतलेल्या कर्जावर नऊ कोटी एवढे व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT