Thane School Admission Festival
ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये दि. १६ जून, २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२८ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ७१ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना ३ हजार २७९ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने होत असून, जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून हे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य केले जात आहे.
शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश शिक्षणाची गोड सुरुवात घडवून आणणे, बालकांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण करणे व पालकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. १६ जून २०२५ रोजी हा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.
* पहिल्या दिवशी १००% विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी विशेष नियोजन.
* दंवडी, प्रभातफेरी, व पत्रक वाटपाद्वारे जनजागृती अभियान.
* तालुक्यातील सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना १००% शाळेत प्रवेश देणे हे ध्येय.
* शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना शोधून प्रवेश देण्यासाठी विशेष सर्वेक्षण व अहवाल.
* प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
* पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पायाचा ठसा घेतला जाणार
* मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे यांचे वितरण.
* पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ.
* प्रभातफेरी, ढोल, बॅनर व फलकांद्वारे गावात जनजागृती.
* कोविड-१९ अनुषंगाने आरोग्यविषयक प्रबोधन व मार्गदर्शन
दि. १४ व १५ जून रोजी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व सजावट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा परिसरात स्वच्छ, आकर्षक व विद्यार्थी स्नेही वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.