

Raigad ZP school uniform issue
रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा यंदा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, बुटाचा जोड आणि मोजे दिले जाणार आहेत. मात्र, गणवेशाचा दुसरा जोड तब्बल चार महिन्यांनी म्हणजेच दिवाळीत दिला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन-साडेतीन महिने विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर काढावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक नाराज झाले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे तब्बल 98 हजार 572 विद्यार्थी आहेत. या सर्वांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि गणवेश देण्याचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी देण्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरु आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सध्या पहिल्या गणवेशाची शिलाई युद्धपातळीवर सुरू आहे.
तीन आठवड्यांपूर्वी सरकारकडून आलेला गणवेश, मोजे, बुटासाठीचा निधी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गणवेशाची शिलाई पूर्ण झाल्यानंतर आणि बूट-सॉक्स यांची खरेदी केल्यानंतर त्याची पावती जोडून गटशिक्षणाधिकार्यांकडे द्यायची आहे. त्यानंतर त्यांच्याकडून संबंधितांना तो निधी वितरित होईल. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याचे निर्देश शिक्षणाधिकार्यांनी गटशिक्षणाधिकारी आणि सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.
यंदा दुसर्या आठवड्यात दिवाळी आहे. जूनच्या दुसर्या आठवड्यात पहिला गणवेश मिळाल्यानंतर दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना चार महिने एकाच गणवेशावर शाळेत यायचे आहे. मात्र, तेवढा निधी उपलब्ध नसल्याने दुसर्या गणवेशासाठी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. त्यामुळे गणवेश भिजल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे किंवा सलग सहा दिवस एकच गणवेश विद्यार्थ्यांनी कसा वापरायचा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. त्यासाठी सरकारकडून प्रत्येकी 600 रुपयांचा निधी दिला जातो. एक गणवेश शाळेचा, तर दुसरा गणवेश स्काऊट गाईडच्या धर्तीवर मिळणार आहे. सध्या पहिल्या गणवेशाचा निधी सरकारकडून देण्यात झाला आहे. हा गणवेशदेखील यंदा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच दिला जाणार आहे.