

Mumbai Local Train Problems
नेवाळी : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये १३ प्रवासी रेल्वेतून खाली पडले अन् त्यापैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेकडून मंगळवारी आंदोलन करण्यात येणार आहे. तर या घटनेनंतर मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी समाज माध्यमातून आपले मतं व्यक्त करत सांगितले की लाडक्या वंदे भारतने लोकलचे वांदे केले आहेत. अस म्हटलं आहे.
मनसे नेते राजू पाटील म्हणाले की, दिवा - मुंब्रा स्थानकादरम्यान झालेली रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आज पुन्हा एका आईचे लेकरू, बहिणीचे कुंकू घरी परतणार नाही. या दुर्घटनेत प्रवासी लोकलमधून खाली पडले असून काहीजण गंभीर जखमी आणि काही जणांचं दुःखद निधन झालं. निधन पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना. खरंतर रेल्वे प्रवासी संघटना, विविध राजकीय पक्ष तसेच अनेक जागरूक नागरिकांनी रेल्वे बोर्डकडे दिवा ते कळवा या जीवघेण्या मार्गाबाबत अनेक तक्रारी केल्या असतानाही रेल्वे प्रशासनाकडून यावर कोणतीही उपाययोजना न केल्याने या मार्गावर यापूर्वीही अनेक प्रवाशांनी प्राण गमावले आहेत.
वास्तविक कल्याण ते ठाणे दरम्यानच्या दोन नवीन मार्गांचे (५वी व ६ वी लाईन) काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक लोकल सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती व तसा गवगवा पण केला गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनप्रसंगी अधिक लोकल सेवेचे आश्वासन दिले होते. परंतु लाडक्या वंदे भारतने लोकलचे वांदे केले हेही दिसून येत आहे. म्हणजेच डिआरएम यांनी हा निर्णय उलटवून या मार्गावर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले का? खरंतर कल्याण पासून पुढे फक्त लोकलसाठी चार मार्ग राखून ठेवायला हवेत.
एकंदरीतच मेल व एक्सप्रेस या शहरांच्या बाहेरून नवीन एक्सप्रेस टर्मिनल उभारून सोडण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. बुलेट ट्रेनवर लाखो करोड खर्च करण्यापेक्षा मुंबई लोकलसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त बोर्ड निर्माण करावा.