ठामपा, एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन लाख ग्राहक अंधारात  pudhari photo
ठाणे

Thane electricity crisis : ठामपा, एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन लाख ग्राहक अंधारात

रस्ता खोदताना वीजवाहिन्या तुटल्याने रोज होते बत्तीगुल्ल; महावितरणाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : दिलीप शिंदे

घोडबंदर रोडवर सर्व्हिस रोडचे एकत्रिकरण आणि मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रस्त्यावरील वीज खांबे तसेच भुयारी लाईन स्थलांतरीत न करता सिमेंटचे रस्ते बनविण्यासाठी रोज होणाऱ्या खोदकामामुळे वीज वाहिन्या आणि जलवाहिन्यांचे नुकसान होऊ लागले आहे. अगोदरच भीषण उष्णतेमुळे जीव नकोसा झाला असताना दररोज दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने सुमारे दोन लाख ग्राहक हैराण झाले आहेत.

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण मे महिन्यात असाच नाहक त्रास सोसावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे वाहिन्या दुरुस्ती तसेच बिलापोटी महावितरणाला कोट्यवधी रुपयांचा नुकसानही सहन करावा लागत आहे.

घोडबंदर रोड परिसरात दररोज तीन ते चार तास वीज गुल होत असते. या परिसरात सुमारे दोन लाख वीज ग्राहक आहेत. त्यांचा वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा भीषण उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असताना अचानक वीज पुरवठा खंडित होतो. रात्री देखील दोन ते चार तास वीज गुल होत असल्याने चाकरमानी, लहान मुले आणि वयोवृद्ध हैराण झालेले आहेत.

याबाबत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जात असून अनेकदा त्रस्त नागरिकांच्या रोषाला वीज मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा पोलिसांना पाचारण करावे लागत आहे.

घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडच्या मर्जिंगचे काम सुरु असून त्यासाठी मोठ्याप्रमाणावर खोदकाम होत आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या कामासाठीही खोदकाम होत आहे. दोन्ही यंत्रणांमार्फत जे. सी. बीने खोदकाम करताना रस्त्यावरील विद्युत वाहिन्या तुटू लागल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे 22 केव्हीची वाहिनी तुटली की 11 केव्ही ट्रान्स्फार्मरवरून वीजपुरवठा फिरविला जात असतो. त्यामुळे विजेचे भार वाढते आणि कधीही वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाली आहे. या संतापाचा उद्रेक कधीही होऊ शकतो, अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता सर्व्हिस रस्त्याचे घोडबंदर रोडमध्ये एकत्रीकरण करताना रस्त्याखालील वीज वाहिन्या, जल वाहिन्या, गॅस वाहिनी, अन्य केबल स्थलांतरीत करण्यात आलेल्या नाही. या कामांचा विसर एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेला पडला आणि त्यांनी कामे सुरु केली. त्याचा खर्च कोण करणार यावरून वाद झाला आणि त्याचा फटका घोडबंदरवासियांना बसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब संबंधित यंत्रणेच्या कानी घालून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. केवळ ठेकेदाराच्या हितासाठी काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे.

महावितरण कडून सर्व विजेचे खांबे आणि भुयारी विद्युत वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी आराखडाही दिला. मात्र एमएमआरडीएने आपल्या टेंडरमध्ये त्याचा समावेश केला नाही. फक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी मेट्रोच्या कामांसह सेवा रस्त्याचे मर्जींग सुरु केले आणि लोकांच्या जीविताशी खेळ मांडलेला दिसून येतो. रस्त्याच्या मधोमध विजेचे खांबे उभे असून त्याला दररोज एक दोन वाहने धडक आहेत. दररोज अपघात होत असताना वाहतूक पोलीस देखील फक्त वाहन चालकांकडून चलान फाडण्यासाठी वाहनांच्या मागे धावताना दिसत आहेत.

संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरणार

पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा सर्व्हिस रोडचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ठेकेदार ते पूर्ण करेल अशी काही परिस्थिती दिसत नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेला अशाच डेडलाईन दिलेल्या होत्या. तरीही काम काही झालेले नाही. यावरून ठाणेकरांच्या जीवाशी खेळणे बंद झाले नाही तर संतापलेले नागरीक कधीही रस्त्यावर येतील अशी स्फोटक परिस्थिती तयार झालेली आहे. याबाबत ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाला विचारणा केली असता विजेचे खांबे आणि वाहिन्या टाकण्यासाठी 75 कोटींचा खर्च महापालिका करीत असून त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच त्या कामाला सुरुवात होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT