ठाणे : राजकारण म्हणजे जनतेसाठी नेतृत्व, विकास आणि प्रामाणिक सेवा हे अनेक जण सांगतात. पण आजच्या काळात राजकारणाचं समीकरण सत्तेभोवती फिरताना दिसतं. सत्तेसाठी कोण कोणाशी हातमिळवणी करेल, कोण कुणाला सोडेल, कोणाचा ‘पक्षप्रवेश’ कधी होईल, हे सांगणं कठीण झालं आहे. एकीकडे महायुतीची घोषणा होते, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच गटाविरुद्ध लढताना दिसतात. आणि म्हणूनच जनतेच्या मनात आता एकच प्रश्न घुमतो, नेत्यांच्या खुर्चीसाठी महायुती, मात्र कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी स्वबळ का? आज बहुतांश पक्षांमध्ये तत्त्वांपेक्षा सत्तेचं गणित जास्त महत्त्वाचं झालं आहे.
एकेकाळी विचारसरणीवर उभे राहिलेले पक्ष आता केवळ सत्तेत राहण्यासाठी कोणाशीही तडजोड करत आहेत. कालपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते आज एकाच मंचावर ‘विकासासाठी’ एकत्र येतात. परंतु तळागाळातले कार्यकर्ते मात्र या राजकीय खेळात चिरडले जातात. महायुती, म्हणजे एकत्र येऊन लढा देणं ही कल्पना चांगली असली तरी ती फक्त नेत्यांच्या सत्तेच्या समीकरणापुरती मर्यादित राहते. कार्यकर्त्यांसाठी मात्र ती कधीच खरी ठरत नाही. गावागावात अजूनही जुन्या मतभेदांची, संघर्षांची पार्श्वभूमी असते. तेथे ‘युती’ फक्त पोस्टरपुरती असते; मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते स्वतःच्या ‘स्वबळा’वरच लढतात.
राजकारणात कार्यकर्ते हेच खरे पायाभूत आधार असतात. तेच पक्षाचे विचार, प्रचार आणि कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवतात. पण जेव्हा नेते वरच्या पातळीवर महायुती करतात, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. काल ज्याच्याशी आपण लढलो, त्याच्यासोबत आज हातमिळवणी का? अनेक वेळा कार्यकर्ते मनोमन अस्वस्थ होतात, कारण त्यांच्या संघर्षाला आणि निष्ठेला महत्त्व दिलं जात नाही. निवडणुकीच्या वेळी त्यांना सांगितलं जातं. पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे, एकत्र लढायचं! पण त्या लढाईत त्यांची भावना, आत्मसन्मान आणि निष्ठा कुठे हरवते, हे कोणी विचारत नाही
पूर्वी जनतेला नेत्यांचे आश्वासन, भाषणे आणि घोषणांनी भुलवता येत असे. पण आज मतदार अधिक सजग आणि जागरूक झाला आहे. त्याला माहित आहे की नेत्यांची युती ही केवळ सत्तेसाठी असते. जनतेच्या हितासाठी नव्हे. त्यामुळेच जनता आज पाहते आहे कोण स्वार्थी, आणि कोण मतलबी?
जनतेला आता विचार महत्त्वाचा वाटत नाही, तर कामगिरी महत्त्वाची वाटते. पाच वर्षांनी मतमोजणीच्या दिवशीच ती ठरवते - कोण खरं आणि कोण बनावट. हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे. ‘महायुती’ ही नेत्यांसाठी सोयीची असते, कारण ती त्यांना सत्तेचा दरवाजा खुला करते. पण ‘स्वबळ’ ही कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाची ताकद असते. स्वबळ म्हणजे स्वतःवर, आपल्या विचारांवर आणि आपल्या जनतेवर विश्वास ठेवणं. अशी लढाई हरली तरी प्रतिष्ठा टिकते. कारण ती तडजोडीतून नव्हे, तर निष्ठेतून उभी राहते. इतिहास साक्ष आहे.
जे नेते आणि पक्ष स्वबळावर उभे राहिले, त्यांनी पराभवाला न घाबरता जनतेच्या मनात स्थान मिळवलं. पण जे फक्त सत्तेसाठी युती करत राहिले, ते काळाच्या ओघात जनतेच्या विस्मृतीत गेले. रायगड जिल्ह्यातही युती आणि आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्ता भरडला जात आहे.
कार्यकर्त्यांची मनापासून लढाई
सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक वळणावर लोकांची प्रतिक्रिया मिळते. लोकांना माहित आहे की, नेते सत्तेसाठी महायुती करतात, आणि कार्यकर्ते मनापासून लढतात. म्हणूनच जनता ठरवते की कोण स्वार्थी आणि कोण मतलबी. कोण राजकारणासाठी आहे, आणि समाजकारणासाठी. सत्ता ही कायमस्वरूपी नसते. ती बदलते, ढासळते, आणि पुन्हा उभी राहते. पण कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास हेच राजकारणाचं खरं भांडवल आहे.
महायुतीने खुर्च्या मिळू शकतात, पण स्वबळाने मने जिंकता येतात. आणि लोकशाहीत मनं जिंकणारा नेतेपद टिकवतो. म्हणूनच आजच्या राजकीय परिस्थितीत हा विचार प्रत्येक पक्षाला आणि नेत्यानं लक्षात ठेवला पाहिजे. नेत्यांच्या खुर्चीसाठी महायुती चालेल, पण कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी स्वबळ हवेच! आणि जनता मात्र शांतपणे पाहते आहे, कोण स्वार्थी, आणि कोण खरंच समाजासाठी काम करणारा!