इस्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट File Photo
ठाणे

Thane News : इस्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट

संवेदनशील, अति महत्त्वाच्या ठिकाणांवर गस्त वाढवली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सध्या सुरू असलेल्या इस्राईल-इराण पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश गृहविभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सर्वतोपरीने खबरदारीचे उपाय योजले असून पोलिसांनी इराणी वस्त्या, संवेदनशील व अति महत्वाच्या ठिकाणांवर गस्त व बंदोबस्त वाढवला आहे.

मध्य पूर्व देशात उद्भवलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह, ठाणे जिल्ह्यात देखील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता असल्याने तसेच आतंकवादी संघटनांकडून देशविघातक कारवाया पुन्हा सुरू हेण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याणसह संवेदनशील भागांवर पोलिसांना विशेष गस्त वाढवून लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्देशानुसार ठाणे पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. ठाणे रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळ, महत्वाच्या ठिकाणांसह शहरातील वर्दळीच्या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरातील घडामोडींवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील अफवा व वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सायबर पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

ठाण्यासह, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आदी शहारात हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी वाढवण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या महामार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक मुख्य चौकात तसेच गर्दी व अतिसंवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सीसीटीव्हीद्वारे संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद वस्तू व व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

तपास यंत्रणा सतर्क

मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यात काही ठिकाणी आतंकवादी संघटना आतंकी प्रोपेगैंडा पसरवू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे राज्य एटीएससह केंद्रीय तपास यंत्रणांनी संशयित लोकांवर व परिसरावर करडी नजर ठेवली आहे. तसेच यापूर्वी पकडले गेलेले अतिरेकी व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची माहिती शोधण्यास तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT