ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अखेर महायुतीमध्ये उभी फूट पडली आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वखालील महायुतीच्या परिवर्तन पॅनलशी शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे आज शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर केले.
त्याच बरोबर भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांचा समावेश असलेल्या पक्ष विरहीत सहकार पॅनलची घोषणा करत बिनविरोध निवडून आलेल्या दहा पैकी आठ संचालक सहकार पॅनलचे असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार म्हस्के, खासदार बाळू मामा म्हात्रे, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषेदेत संयुक्तरित्या जाहीर केले.
ठाणे जिल्हा बँकेची २७ जून रोजी निवडणूक होणार असून २१ पैकी १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोध आलेल्या संचालकांपैकी भाजपचे बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील (कल्याण) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनील भुसारा (मोखाडा) बहुजन विकास आघाडीचे मनीष पाटील (वसई) भाजपचे जयेश पाटील (अंबरनाथ), शिवसेनेचे सौरभ पवार (मुरबाड) शिवसेनेचे आमदार अमित घोडा (डहाणू) दसु रड्या (तलासरी) आणि वाड्याच्या भाग्यश्री भोईर हे सहकार पॅनलचे आहेत.
मात्र विक्रमगड तालुक्यातील उमेदवार सहकार पॅनलने जाहीर केले नाही. त्यामधून सेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आणखीन ३ संचालक निवडून येतील आणि बहुमताचा ११ संचालकांचा जादुई आकडा सहकार पॅनल १०० टक्के गाठेल असा विश्वास माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी व्यक्त केला.
तर खासदार नरेश म्हस्के यांनी सहकार क्षेत्रात दिवंगत आनंद दिघे, शिवसेना प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीच राजकारण आणले नसून त्यांनी सहकार्य केले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेनेची चर्चा सुरु असताना दुसऱ्या परिवर्तन पॅनल जाहीर झाला आणि त्यांच्या सोबत गेलेले शिवसेना नगरसेवक संचालक बाबाजी पाटील हे सुद्धा आमच्याकडे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या कपिल पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा नसून सहकार पॅनलमधून निवडणूक लढविणार असल्याचे म्हस्के यांनी सांगत गृहनिर्माण व इतर संस्था मतदार संघातून रंभाजी पाटील, पगार सेवकांच्या सह, पतसंस्था, नागरी सहकारी संस्थांमधून विशाल भाऊ कुऱ्हाडे, इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून स्वप्नील मुंबईकर, माजी खासदार बळीराम जाधव हे अनुसूचित जातीमधून निवृत्ती घुसेकर हे विमुक्त जाती, भटक्या जमाती संघातून तर महिलांमधून नीता कांबळी आणि स्मिता रवींद्र घोडविंदे यांची उमेदवारी जाहीर केली.
त्याचबरोबर जव्हार तालुक्यातून ज्योती पाटेकर, शहापूर प्रकाश वरकुटे आणि पालघरमधून नागेश पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी बोलताना खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले ही सर्वपक्षीय निवडणूक असून कुणाशी आमची लढाई नाही. ही लढाई विचारांची लढाई असून या बँकेच्या निवडणुकीतून एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.
शिवसेनेने निलेश सांबरे यांना डावलले?
शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी विक्रमगड आणि ओबीसी अशा दोन मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना परिवर्तन पॅनलने उमेदवारी दिली नसून सर्व पक्षीय सहकार पॅनलने स्वप्नील अनिल मुंबईकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र विक्रमगड मधून सहकार पॅनलने उमेदवार जाहीर केला नसल्याने सांबरे यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांबरे यांच्याबाबत विचारणा केली असता खासदार नरेश म्हस्के म्हणाले सांबरे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्यात येईल आणि नगरसेवक बाबाजी पाटील यांच्याशीही बोलू.