मिरा रोड : मिरा रोड येथे राहणाऱ्या एका 52 वर्षीय महिलेला मोबाईल ॲपवरील उत्पादनांना लाईक करून कमिशन (नफा) देण्याच्या बहाण्याने तब्बल 88 लाख 7 हजार 900 रुपयांची ऑनलाईन गंडा घालत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीमती नीलाक्षी सुवर्णा (वय 52 ) , रा. पूनम सागर कॉम्प्लेक्स, मीरा रोड यांनी 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांना सुरुवातीला आरोपींनी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या ॲपवरील उत्पादनांना लाईक केल्यास प्रत्येकी 20 ते 30 रूपये नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना पैसे गुंतवण्यास लावले. गुंतवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण 88,07,900 रूपये एवढी मोठी रक्कम ऑनलाईन पाठवली. पैसे गुंतवूनही नफा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये अज्ञात मोबाईल धारक , ग्रुपची ॲडमीन प्रियंका राठोड व साक्षी बनवाल या तिघांनी संगनमत करून फसवणूक केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अहिरराव हे तपास करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.