

कोल्हापूर : मनी लॉड्रिंगच्या 538 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सायबर भामट्यांनी राजारामपुरी येथील तेराव्या गल्लीत राहणार्या निवृत्त प्राध्यापकाला 78 लाख 90 हजाराला गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान करून 16 लाख 45 हजारांची रक्कम गोठविली. सायबर भामट्यांनी वर्षभरात शहरातील पाच निवृत्त अधिकारी, प्राध्यापकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात फसवणुकीचा हा प्रकार घडला. बँक खात्यातील रक्कम संपल्याने संबंधित प्राध्यापकांनी सहकारी मित्रांकडे उसनवारीने मोठ्या रकमेची मागणी केल्यानंतर मित्रांना संशय आला आणि सायबर भामट्याच्या कृत्याचा भांडाफोड झाला. दरम्यानच्या काळात सायबर भामट्यांनी प्राध्यापकाकडून 78 लाख 90 हजार रुपये उकळले होते. फसवणुकीची फिर्याद दाखल होताच राजारामपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान करून साडेसोळा लाख रूपयाची रक्कम बॅकेतून गोठविली.
पोलिस सुत्राकडून सांगण्यात आले की, मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचा बहाणा करून भामट्यानी निवृत्त प्राध्यापक व त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. तुमच्या वापरातील मोबाईल सिम कार्ड काही तासात बंद होणार आहे. असे भामट्यानी भासविले.त्यांनतर फिर्यादीशी व्हॉटसअप कॉल करून, पोलिस ठाण्याचा सेट दाखवून मउमेश मच्छिंद्रफ या नावाने वरिष्ठाधिकारी बोलत असल्याचे भासविले.
नरेश गोयल मनी लॅड्रिंग अॅण्ड इन्व्हेंस्टमेंटच्या 538 कोटीच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात आपल्या आधारकार्डाचा वापर झाला आहे. त्यामुळे 538 कोटीच्या घोटाळ्यात डिजीटल अरेस्ट होवू शकते, अशी भामट्याने भिती दाखविली. नरेश गोयल याचे फोटो पाठवून फिर्यादीसह त्याच्या वयोवृध्द पत्नीला दिवसभर व्हॉटसअप,व्हीडीओ कॉलवर गुंतवणूक ठेवण्यात आले.
निवृत्त प्राध्यापकांसह त्यांचे जवळचे नातेवाईक, बॅक खात्याची माहिती घेऊन, न्यायालयाचा सेट दाखवून खटल्याची सुनावणी सुरू असल्याचे वयोवृध्द दांम्पत्याला भासविले. डिजीटल अरेस्टची भिती दाखवून फिर्यादीची सहमती नसतानाही भामट्यानी प्राध्यापकाकडून आर.टी.जी. एस व नेट बॅकिंगद्वारे 78 लाख 90 हजाराची रक्कम पाठविण्यास भाग पाडले. असेही फिर्यादीत म्हटले आहे.