ठाणे

Thane news | रेल्वे प्रशासनाचा निष्ठुरपणा! सिमेंट स्लीपरखाली दबून दोन निष्पाप कुत्र्यांची पिल्ले दगावली

पिलांना वाचवण्यासाठी 'त्या' माऊलीची केविलवाणी धडपड

पुढारी वृत्तसेवा

शाम धुमाळ

कसारा : कसारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक निष्ठुरपणा समोर आला आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळील सायडिंग यार्डमध्ये निष्काळजीपणे सिमेंटचे अवजड स्लीपर उतरवल्यामुळे, त्याखाली दबून दोन कुत्र्यांची पिल्ले दगावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तर उर्वरित पिल्लांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईची आणि प्राणीमित्रांची सुरू असलेली धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

नेमकी घटना काय?

कसारा रेल्वे स्थानकाजवळ नवीन ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी ठेकेदार कंपनीने सिमेंटचे अवजड स्लीपर मागवले होते. मात्र, हे स्लीपर खाली करताना संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी तिथेच मोकळ्या जागेत बसलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जेसीबी किंवा क्रेनच्या साहाय्याने हे स्लीपर थेट पिल्लांच्या अंगावरच उतरवण्यात आले. यामुळे ५ ते ६ पिल्लं या वजनी स्लीपरखाली अडकली. आपला जीव वाचवण्यासाठी ही निष्पाप पिल्लं तब्बल ३ ते ४ तासांपासून तिथेच तडफडत होती. त्यांना जन्म दिलेल्या कुत्रीनेही आपल्या पिलांना बाहेर काढण्यासाठी जीवाचा आकांत केला, मात्र अवजड स्लीपर हलवणे तिला शक्य नव्हते.

आपत्ती व्यवस्थापन आणि प्राणीमित्रांचे प्रयत्न अपयशी

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य आणि स्थानिक प्राणीमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिल्लांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, स्लीपर अत्यंत वजनी असल्याने ते हाताने बाजूला करणे अशक्य होते. ते हटवण्यासाठी क्रेनची अत्यंत आवश्यकता होती.

"तुम्ही चमच्याने दूध पाजा!" रेल्वे प्रशासकांचे उद्धट वर्तन

या गंभीर प्रसंगी रेल्वे प्रशासनाकडून मदत मिळण्याऐवजी अत्यंत संतापजनक अनुभव आला. प्राणीमित्र आणि आपत्ती व्यवस्थापन सदस्यांनी मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मॅनेजर कार्यालयात धाव घेतली. परंतु, तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. "तुम्ही चमच्याने दूध पाजा," असे अत्यंत अमानुष आणि उद्धट वक्तव्य करून त्यांनी या संवेदनशील घटनेची थट्टा उडवली. रेल्वे प्रशासनाने क्रेन देण्यास किंवा कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन पिल्लांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर उर्वरित पिल्लांना उशिरापर्यंत बाहेर काढता आले नव्हते. आपल्या डोळ्यादेखत पिल्लांचा जीव गेल्याने ती मूक माऊली (कुत्री) आणि उपस्थित सर्वच जण निशब्द झाले होते.

कारवाई करण्याची मागणी

या अमानुष घटनेमुळे कसारा परिसरातील नागरिकांमध्ये आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुक्या प्राण्यांच्या जिवाची किंमत न बाळगणाऱ्या आणि निष्ठुरपणे वागणाऱ्या त्या ठेकेदारावर आणि वाहनचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तसेच, पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी आणि प्राणीमित्रांशी अत्यंत संवेदनशील आणि उद्धट वर्तन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT