दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून बदलापूर बंदची हाक  file photo
ठाणे

Thane News | आज बदलापूर बंदची हाक

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून मंगळवारी (20 ऑगस्ट) बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यात विविध व्यापारी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना तसेच राजकीय पक्ष, महिला पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आता नागरिकांचा जनक्षोभ थांबवण्याचे मोठे आवाहन असणार आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास वेळ लावणार्‍या व तपासात हायगय करणार्‍या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी किरण बालवडकर या नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सोमवारी सकाळी त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला.

मंगळवारी (दि.20) सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शितोळे यांच्या कार्याभोवती अनेकांच्या मनात संताप होता. गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना रात्री साडेबारावाजेपर्यंत बसवून ठेवल्यामुळे व त्यांची भूमिकाही संशयास्पद असल्यामुळे पालक आणि उपस्थित सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार शुभदा शितोळे यांची स्पेशल ब्रांचला बदली करून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याची जबाबदारी आता किरण बालवडकर या अधिकार्‍यांकडे देण्यात आल्याची माहिती डीसीपी सुधाकर पाठारे यांनी दिली. किरण बालवडकर यांनी या प्रकरणाचा तपासा घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच या प्रकरणात अन्य गोष्टींचाही तपास करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन तपास करणार असल्याचे किरण बालवडकर यांनी सांगितले. तर नागरिकांनी आंदोलन आणि बंद न पाळता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डीसीपी सुधाकर पाठारे यांनी केले आहे.

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा- किसन कथोरे

बदलापुरातील शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार किसन कथोरे यांनी केली होती. ती मागणी गृहमंत्र्यांनी मान्य करत खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पोलिसांना आदेश केले आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे. या चिमुकल्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहणार असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, शाळेचा माफिनामा

ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळा प्रशासनाने खाजगी कंपनीला दिलेले स्वच्छतेचे कंत्राट रद्द केले आहे. तसेच मुख्याध्यापकांचेही निलंबन करण्यात आले असून ज्या सेविकांवर मुलींना स्वच्छतागृहापर्यंत घेऊन जाण्याचा जबाबदारी होती, त्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. तसेच एका वर्गशिक्षकेलाही निलंबन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणात संस्था पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे संस्थाचालकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT