बदलापूर : बदलापूर पूर्वेकडील एका शाळेतील २ ते ४ वर्षे वयाच्या अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मंगळवारी (दि.२०) बदलापुरातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. तसेच शाळेसमोर एकत्र जमून शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आज सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच हजारो बदलापूरकर या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाने सकाळी दहा वाजता उग्र रूप धारण केले. अनेक आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देताना पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकल्या, तसेच पाण्याच्या बाटल्या ही फेकल्या. पोलिसांनी बचावासाठी नंतर लाठीचार्ज केला. त्यानंतर तेथून पांगलेला जमाव हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला.
रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेदहा वाजल्यापासून आंदोलकांनी रेल रोको करून ठेवला. त्यामुळे बदलापूर ते वांगणी दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. आंदोलन इतके आक्रमक होते की पोलिसांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आंदोलना नव्हते. आंदोलकांमध्ये विशेष करून तरुण आणि तरुणींचा भरणा मोठा होता. रेल्वे पोलीस आयुक्त स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला "फाशीची शिक्षा झालीच पाहिजे" अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दुमदमून सोडला होता.
एकीकडे रेल्वे रुळांवरील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी रेल्वे रुळांवर बसलेल्या आंदोलकांना लाठीमार करून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला असता दुसरीकडे असलेल्या आंदोलकांनी उलट पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक पाण्याच्या बाटल्या आणि कागदाचे गोळे फेकून मारले.
असाच काहीसा प्रकार शाळेच्या ठिकाणीही घडला. आंदोलक पोलीस आणि शाळा प्रशासनाशी चर्चा करून आरोपींच्या फाशीची मागणी करत होते. मात्र, शाळा प्रशासनाकडून कोणीही समोर येत नसल्याने संयम सुटलेल्या काही पालकांनी थेट शाळेत घुसून शाळेची मोडतोड केली. त्यामुळे शाळेतही या आंदोलकाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. बदलापूर नगरपालिकेसमोर पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
दुपारी दीड वाजेपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी आपला ठिय्या कायम ठेवला होता. तसेच शाळे बाहेरही पालक आंदोलनावर ठाम असल्यामुळे पोलीस प्रशासना समोर आंदोलकांना शांत करण्याचा मोठे आवाहन निर्माण झाले. मुंबई, ठाण्याहून अधिक पोलिसांची कुमक बोलवून आंदोलनकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.