Mumbra Baby Sale Case Pudhari
ठाणे

Dombivli baby trafficking case: ठाणे परिसरात नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचे रॅकेट? जुन्या घटनांतून धक्कादायक माहिती

मुंब्र्यात अडीच लाखांत विक्री झालेल्या २० दिवसांच्या बाळाची सुटका; डोंबिवली आणि बदलापुरातील जुन्या प्रकरणांतही टोळ्यांचा सहभाग समोर.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अडीच लाखांत विक्री करण्यात आलेल्या एका २० दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका केली आहे. या घटनेनंतर बाळ खरेदी-विक्री रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

कचरा वेचणाऱ्या, भीक मागणाऱ्या गरीब पालकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नवजात बाळांची खरेदी-विक्री करणारी टोळी ठाणे परिसरात कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. विशेष म्‍हणजे या मुलांचे रेट कार्ड ठरले होते. गोरी मुले ५ लाख, सावळी मुले ३ लाखांना विक्री केली जात होती.

१२ नोव्हेंबर २०२४ रोजी एका टोळीस ठाणे पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक पथकाने डोंबिवली येथील एका महिलेसह बाळ विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली होती. ४२ दिवसाच्या बालकाची चार लाखात विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाने त्यावेळी बेड्या ठोकल्या होत्या.

या टोळीत बाळाच्या आईचा समावेश होता. ऑक्टोबर २०१७ मध्ये ठाणे गुन्हे शाखा पथकाने बाळ खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली होती. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.

गरीब माता-पित्याकडून मुले आणून ती मुंबईत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले होते. ही टोळी चालवणारी मुख्य सूत्रधार राखी बाबरे ही महिला होती.

ती मुले तस्करी करण्यापासून ज्यांना मूल होत नाही, अशा लोकांना ‘सरोगसी मदर’साठी महिला पुरवण्यापर्यंतची कामे करीत होती. विशेष म्हणजे ही महिला सामाजिक कार्यकर्ती म्हणून मिरवत लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने मुलांची तस्करी करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इन्स्टाग्राम व यूट्यूबवर एक स्वतंत्र चॅनेल

डिसेंबर २०२५ मध्ये बदलापुरात सात दिवसाच्या बालकाची सहा लाखात विक्री करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे मूल दत्तक देण्याच्या नावाखाली नवजात बाळाची विक्री करणाऱ्या या टोळीने इन्स्टाग्राम व यूट्यूबवर एक स्वतंत्र चॅनेल बनवले होते. या चॅनेलवर ही टोळी नवजात बाळांचे फोटो व व्हिडीओ अपलोड करून ग्राहक हेरत होते व बाळ विक्री करीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT