BMC Online Engineer Transfers: मुंबई महापालिकेत ऑनलाइन बदल्यांनंतर ५० अभियंत्यांची इमारत व कारखाने विभागात नियुक्ती

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग देण्याचा महापालिकेचा प्रयत्न
BMC
BMCpudhari photo
Published on: 
Updated on: 

प्रकाश साबळे

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच राबविण्यात आलेल्या अभियंत्यांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेनंतर प्रशासनाने इमारत व कारखाने विभागात तब्बल ५० अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या नगर अभियंता विभागाने दिवाळीत ६९५ अभियंत्यांच्या संगणक प्रणालीद्वारे बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत.

यामुळे शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळविणे, बेकायदा बांधकामांवर प्रभावी कारवाई करणे आणि बांधकाम परवानग्यांशी संबंधित कामकाजाला गती देण्याचा या नियुक्त्यांमागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

BMC
Mumbai Water Supply: मुंबईकरांना पाणीटंचाईची सवय झाली का?पाणीपुरवठ्यात ४०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त घट

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये इमारत व कारखाने विभागाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

या विभागात अभियंत्यांची संख्या वाढल्याने अनधिकृत बांधकामांची तपासणी, बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, तसेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

BMC
Devgad Alphonso Mango: नोव्हेंबरमध्येच देवगड हापूस बाजारात; दोन पेट्यांना ४० हजारांपर्यंत दर

या बदल्यांमध्ये १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंत्यांचा समावेश आहे. प्रशासकीय आवश्यकता, रिक्त पदांची उपलब्धता, अभियंत्यांचे विनंती अर्ज, विभागांच्या शिफारशी आणि पदोन्नती प्रक्रियेचा विचार करून या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या २७ जानेवारी २०२१ रोजीच्या धोरणानुसार दरवर्षी अभियंता संवर्गातील बदल्या केल्या जातात. संबंधित विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के अभियंत्यांच्या बदल्या करण्याची तरतूद आहे. यासाठी नगर अभियंता कार्यालयामार्फत प्रक्रिया राबविली जाते.

परिरक्षण विभागातील अभियंत्यांची इमारत व कारखाने विभागात बदली

महापालिकेच्या विभाग कार्यालयातील परिरक्षण खात्यात गेल्या तीन वर्षापेक्षा अधिक काळ ठाम मांडून पडलेल्या सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता संवर्गातील अभियंत्यांची नगर अभियंता विभागाने चांगला दणका दिला आहे.

अशा मक्तेदारी करून बसलेल्या अभियंत्यांची बदली इमारत व कारखाने विभागात केली आहे. यामुळे काही अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे.

बदलीनंतर ५ दिवसांत हजर होण्याचे निर्देश

बदली झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाच दिवसांच्या आत जुन्या विभागातून कार्यमुक्त होऊन नव्या विभागात रुजू व्हावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

निर्धारित मुदतीत कार्यमुक्त न झाल्यास संबंधितांचे वेतन व भत्ते मूळ खात्यातून काढता येणार नाहीत. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि खातेप्रमुखांनाही जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्तांशी सेंटिंग करण्याचा प्रयत्नांची चर्चा जोरात

ज्या अभियंत्यांना परिरक्षण विभागातून इमारत व कारखाने विभागात बदली झाली आहे, अशा अभियंत्यांकडून विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत सेंटिंग करून त्या वाॅर्डात परिरक्षण खाते मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे अभियंत्यांकडून ऑनलाइन बदली प्रणालीला केराची टोपली दाखविली जात असल्याची चर्चा विभाग कार्यालयात सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.