Thane Municipal Corporation  Pudhari
ठाणे

Thane Property Tax: ठाण्यात मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; हजारो नोटिसा, अनेक मालमत्ता सील

६ हजार ५८० मालमत्ताधारकांना नोटिसा; २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली असून, थकबाकीदार करदात्यां- विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर अनेक करदात्यांनी कराचा भरणा केला असला, तरी अद्याप काही मालमत्ताधारकांनी थकीत कर जमा केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अधिनियमानुसार थकीत कर कारवाईस पात्र ठरलेल्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेमार्फत वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६ हजार ५८० मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, २८६ मालमत्तांवर वॉरंट बजावून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, ७३ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून, १२६ मिळकतीच्या वापरास अटकावणी (सिल) करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अधिक कडक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

त्यानुसार प्रभागनिहाय सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीच्या कारवाईदरम्यान अप्रिय घटना टाळण्यासाठी, ज्या करदात्यांनी अद्याप थकीत कर भरलेला नाही, त्यांनी आपला देय कर तातडीने महापालिकेकडे जमा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

थकीत मालमत्ता कराचा भरणा आवश्‍यक

मालमत्ताधारकांना कराचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेने ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळासह Google Pay, PhonePe, Paytm, BHIM App, QR कोड आणि WhatsApp Chatbot यांच्या माध्यमातून कर भरता येतो. थकीत मालमत्ता कराचा भरणा करून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT