

दीपक घोसाळकर
कळंबोली: कळंबोली वसाहतीमध्ये एकमेव असणारा रोडपाली म्हसोबा देवस्थानच्या तलावाचे पाणी दूषित झाले आहे. गणेश विसर्जन व नवरात्र उत्सवातील देवींच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे हजारो मासे यातील मृत पावले आहेत. मृत पावलेल्या माशांमुळे तलावा परिसरामध्ये दुर्गंध ही पसरत चालली आहे.
या तलावांमधील विसर्जित केलेल्या मूर्ती काढून तलावाची साफसफाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नवरात्र उत्सवात नागरिकांनी बसवलेले घट ही तसेच तलावात टाकल्याने तलाव अधिक प्रदूषित झाले असल्याचे येथील नागरिक म्हणत आहेत. महापालिकेने या तलावाकडे लक्ष देऊन तलावाची साफसफाई व असलेल्या माशांचे संवर्धन करण्याची मागणी केली गेली आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये रोडपाली गावालगत असलेले म्हससर म्हणजेच म्हसोबा देवस्थानचे असलेले तलाव हे महापालिकेकडून चांगले सुशोभित करण्यात आले आहे. या तलावामध्ये चिलाबी, कटला, फंटूस, जिताडी जातीचे माशांचे चांगल्या प्रकारचे संवर्धन झालेले होते.
परंतु गणेशोत्सव व नवरात्र उत्सवा मधील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केल्याने तलाव प्रदूषित झाला असल्याचे नागरिकांचे मत आहे. या मूर्तींवर असलेल्या विविध प्रकारचे रासायनिक रंग या तलावात उतरल्याने तलाव पूर्ण प्रदूषित झाला.
त्यामुळे तलावांमधील असलेले तीन ते चार किलो वजनाचे व दीड ते दोन फूट लांबीचे वजनदार मासे हे मरून तलावात तरंगू लागले आहेत. नवरात्र उत्सव होऊनही एक आठवड्याचा काळ लोटला तरी मासे अजूनही मरत आहेत. या तलावात विविध प्रजातीचे अजून माशांची हजारो पिल्ले पहावयास मिळतात.
महापालिका प्रशासनाने या तलावात असलेल्या विसर्जित केलेल्या परंतु त्याचे विघटन न झालेल्या गणेश व देवींच्या मूर्ती काढून तलाव पूर्ण साफ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कळंबोली वसाहती मध्ये सायंकाळ व सकाळच्या वेळी फेरफटका मारण्याचे एकमेव असे सुशोभीकरण केलेले ठिकाण आहे. परंतु या तलावाचे पाणी प्रदूषित झाल्याने येथील मासे दररोज मरून तरंगत आहेत.
तरंगते मासे न काढल्यामुळे ते कुजूनही जात आहेत. त्याच्यामुळे पाणी अधिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्ये कडे त्वरित लक्ष देऊन येतील मरण पावलेले मासे काढावे व यात असलेल्या कचरा तसेच विसर्जित केलेल्या मूर्ती काढून तलावाची साफसफाई करण्याची मागणी आता केली जात आहे.
या ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक हे तलावामध्ये निर्माल्य टाकन्यासाठी आलेल्या नागरिकांना रोखत आहेत.परंतु काही नागरिक हे तलावतच विसर्जन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यासाठी कडक कायदा करून दंडात्मक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या तलावात माशांमध्ये सर्वाधिक पसंतीत व सर्वाधिक मागणी असलेल्या जीताड्या सारख्या महागड्या माशाचेही संवर्धन होत आहे. एक ते पाच किलो दरम्यानचे जिताडे मृत झालेले पाहून नागरिकांनी हळहळ ही व्यक्त करत आहेत. जिताडा मासा एक तर कुठेही मिळत नाही आणि तो कळंबोली तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु तलाव प्रदूषित झाल्याने ते आता मृत पावत आहेत.
याबाबतची त्वरित पाहणी कळंबोलीतील रोडपाली तलावाची करण्यात आलेली आहे मासे का मरण पावत आहेत. याची तपासणी ही लवकरात लवकर करण्यात येणार आहे. तलावातील पाण्याचे नमुने हे परीक्षणासाठी अलिबाग येथील मच्छ विभागाच्या पथकाकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक ते दोन दिवसांमध्ये अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करून रोडपालीतील म्हसोबा तलावातील मासे कसे सुरक्षित राहतील याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल.
- विलास चव्हाण, मुख्य अधिकारी, पनवेल महापालिका पाणीपुरवठा विभाग