आरक्षण सोडतीत ठाण्यातील दिग्गजांना फटका... pudhari photo
ठाणे

Thane Municipal Election : आरक्षण सोडतीत ठाण्यातील दिग्गजांना फटका...

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या पुत्रासह भाजप, शिंदेंची शिवसेना आणि शरद पवार गटालाही धक्का

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण झाले असून आरक्षणामध्ये फारसे बदल झाले नसले तरी काही दिग्गज माजी नगरसेवकांना मात्र आरक्षणाचा फटका आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यासह भाजप, शिंदेची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील काही दिग्गजांना या आरक्षणाचा फटका बसल्याने निवडणुकीमध्ये एकतर या सर्व दिग्गजांना वेगळा प्रभाग निवडावा लागणार आहे तसेच तिकीट मिळवता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान ठाणे महापालिकेवर 66 जागांवर महिला नगरसेविका निवडून जाणार असल्याने ठाणे महापालिकेवर महिला राज येणार असल्याचे जवळपास आता निश्चित झाले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनु. जाती (महिला), अनु.जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता मंगळवारी सोडत काढण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. या आरक्षण सोडतीत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु काही मोजक्या मात्र महत्वाच्या दिग्गजांना यात फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये साधना जोशी या शिंदे सेनेच्या माजी नगरसेविकेला आरक्षणाचा फटका बसला आहे. याठिकाणी अनुसूचित जमाती पुरुष आरक्षण आले आहे.

दुसरीकडे प्रभाग क्रमांक 2 मध्येही भाजपच्या कविता पाटील यांना फटका बसला आहे. 2 ब हा नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये पुरुषांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी कदाचित आपल्या घरातील कोणालातरी लढवावे लागणार आहे. तिकडे प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिंदे सेनेचे मधुकर पावशे यांना फटका बसला आहे. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना फटका बसला तरी त्या बाजूच्या वॉर्डातून लढू शकणार आहेत. तिकडे येऊरलाही शिंदे सेनेचे नरेंद्र सुरकर यांचा वॉर्ड महिलेला गेला आहे. त्यामुळे येथेही त्यांना पर्याय द्यावा लागणार आहे. प्रभाग क्र.6 मध्ये राष्ट्र्रवादीचे दिंगबर ठाकूर आता शिंदे सेनेत असून यांना फटका बसला असून येथे महिला आरक्षण पडले आहे.

प्रभाग क्र. 8 मध्ये शिंदे सेनेचे जुने माजी नगरसेवक देवराम भोईर यांनाही आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. आता त्यांना पर्यायी वॉर्ड शोधावा लागणार आहे. किंवा कुटुंबातील सदस्यांची अदलाबदल करून वॉर्ड मिळवावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधून मागील कित्येक वर्षे अजित पवार गटाचे दिग्गज समजले जाणार नजीब मुल्ला यांना देखील काहीसा फटका बसला आहे. परंतु त्यांना क किंवा ड वॉर्डातून लढण्याची संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिपा गावंड (भाजप) यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. याच प्रभागातील भाजपचे कृष्णा पाटील यांना देखील आता पर्याय शोधावा लागणार आहे.

याच प्रभागात कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील आणि मिलिंद पाटणकर देखील आहेत. परंतु आता पाटील यांच्या भावाने देखील तिकीट मागितले आहे. त्यामुळे या प्रभागातून आता तिकीट देतांना भाजपची मोठी कसरत होणार आहे. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये भाजपच्या सुर्वणा कांबळे यांच्यासह ब वार्डातील एकनाथ भोईर यांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यांनी तर महापौर पदाचे स्वप्न पाहिले होते. परंतु आता त्यांना आजूबाजूचा पर्याय देखील नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते कोणता पर्याय निवडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

16 अ मध्ये मनिषा कांबळे यांना तर 22 अ मध्ये भाजपचे सुनील हंडोरे यांना फटका बसला आहे. तिकडे दिव्याचा विचार केल्यास राष्ट्रावादीतून शिंदे सेनेत गेलेल्या प्रभाग 29 अ मधील बाबाजी पाटील यांनाही आराक्षणाचा फटका बसला आहे. त्यांच्या वॉर्डात महिलेचे आरक्षण पडले आहे. प्रभाग क्र.30 अ मध्ये शेख हसिना अब्दुल अजीज (राष्ट्रवादी), यांना फटका बसला आहे. तर तळ्यात मळ्यात राहणारे 31 क चे माजी नगरसेवक राजण किणे यांना देखील आता बाजूच्या प्रभागाचा पर्याय निवडावा लागणार असल्याचे दिसत आहे.

ठाण्यात महायुतीचा भगवा फडकवण्याचा महायुतीच्या नेत्यांचा दावा

महापौर पदासाठी मात्र भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरूच...

कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महायुती व्हावी, त्यानुसार महायुतीत होईलच शिवाय ठाणे महापालिकेवर भगवा फडकेल, असा विश्वास शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी विश्वास व्यक्त केला आहे. परंतु दुसरीकडेच ज्यांचे संख्याबळ अधिक असेल त्याचाच महापौर होईल असा दावा भाजपने केला आहे. तर महापौर बसविण्यात निर्णायक भूमिका ही आमचीच असेल असा दावा अजित पवार गटाचे केला आहे. शिवाय युती होईल की महायुती हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असे सांगत एकप्रकारे युतीबाबत साशंकताही या नेत्यांनी उपस्थित केली आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. दोनही पक्षांकडून एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू आहे. परंतु आरक्षण सोडतीच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे दिसून आले.

केवळ एकत्रच आले नाही, तर त्यांनी महायुतीचा नारा देखील दिला. हा नारा दिला असला तरी अनेकांनी आपल्या मनातील इच्छा देखील बोलून दाखविल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीच्या निमित्ताने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना तीनही नेत्यांनी वेगवेगळा दावा केल्याचे दिसून आले. आम्ही महायुतीचे घटक आहोत, सर्वांची इच्छा ही महायुतीची आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाणे जिल्हा महायुतीचा भगवा फडकेल हे निश्चित आहे. तसेच ठाण्यातही महायुतीचा महापौर बसणार आणि भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

संख्याबळावर महापौर ठरणार

दुसरीकडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सुद्धा ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावा केला आहे. महापौर पदाबाबत बोलताना लेले म्हणाले, महापौर हे शेवटी संख्याबळावर ठरते. आमचं संख्याबळ जर बहुमताच्या जवळ आले, म्हणजेच 65 जागांपेक्षा जास्ता तर स्वाभाविकच भाजपचा महापौर बसेल. सध्या त्यावर भाष्य करण्याऐवजी आम्ही संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले.

आम्हीच महापौर ठरविणार

अजित पवार गटाने देखील महायुतीबाबत भाष्य करताना महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचे सांगताना, त्यात कोणाचा महापौर बसणार, हे आमचाच पक्ष निश्चित करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी देखील त्याचा महायुतीला फटका बसणार नाही. परंतु महापालिका निवडणुकीत युती होईल की महायुती हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

ठाण्याच्या विकासाला वेग मिळेल - सौरभ राव, पालिका आयुक्त

मागील साडेतीन वर्षे ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. आता महापालिकेवर लोकप्रतिनिधी येणार आहेत, त्या निमित्ताने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना छेडले असता, त्यांनी एकाच रथाचे दोन चाके आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आल्याने ठाण्याचा विकास आणखी वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर आरक्षण सोडत अतिशय पारदर्शक पद्धतीने सर्व प्रक्रिया हातळल्याने यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. तसेच याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या माजी नगरसेवकांना बसला आरक्षणाचा फटका....

माजी महापौर मीनाक्षी शिंदे, पुर्वेश सरनाईक, मधुकर पावशे, नरेंद्र सूरकर, देवराम भोईर, कविता पाटील, कृष्णा पाटील, दीपा गावंड, नंदा पाटील, नजीब मुल्ला, एकनाथ भोईर, सुनील हंडोरे, बाबाजी पाटील, शानू पठाण आधी माजी नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये फटका पडला आहे.

मंत्री सरनाईकांच्या पुत्राला आरक्षण सोडतीचा फटका

प्रभाग क्रमांक 14 अ मधून पूर्वेश सरनाईक हे निवडून आले होते. परंतु आता जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत त्यांचा वॉर्डात महिलेचे आरक्षण पडले आहे. त्यात त्यांनी इतर वॉर्डात जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना कसरत करावी लागणार आहे. कारण इतर वॉर्डात देखील मागील कित्येक वर्षापासून निवडून येणाऱ्या शिंदे सेनेच्या शिलेदारांचे प्राबल्य आहे.

मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांच्या निकटवर्तीयांना धक्का

शरद पवार गटाचे खंदेे समर्थक मानले जाणारे शानू पठाण यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. 32 क मधून ते मागील वेळेस निवडून आले होते. परंतु आता हा वॉर्ड महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता आपल्या मुलीला संधी द्यावी लागणार असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांना बाजूच्या वॉर्डाचा पर्याय देखील दिसत नाही.

आरक्षण सोडतीला महिलांच्या संख्या नगण्य...

महापालिकेवर महिला अधिक संख्येने निवडून जाणार असल्या तरी प्रत्यक्षात सोडतीच्या वेळेला गडकरी रंगायतन येथे महिलांची उपस्थिती अगदी नगण्य दिसून आली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिलांचे आरक्षण सोडत असताना देखील महिलांकडून मात्र निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीनता दिसून आली.

ठाणे महापालिका एकूण जागा - 131

1. सर्वसाधारण खुला प्रवर्ग 43 जागा

2. सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला)-41 जागा

3. नागरिकांचा मागास प्रवर्ग - 17 जागा

4. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 18 जागा

5. अनुसुचित जाती - 4 जागा

6. अनुसुचित जाती (महिला) - 5 जागा

7. अनुसुचित जमाती - 1 जागा

8. अनुसुचित जमाती (महिला) - 2 जागा

असे आहे आरक्षण....

अनुसुचित जाती (महिला) 05 जागा

प्रभाग क्रमांक -

3अ, 6अ, 7अ, 22अ, 24अ

अनुसुचित जमाती (महिला) 02 जागा

प्रभाग क्रमांक -

2अ, 5अ

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 18 जागा

प्रभाग क्रमांक -

1ब, 3ब, 6ब, 7ब, 8अ, 9ब, 10अ, 14अ, 15ब, 16ब, 17अ, 19अ, 24ब, 26अ,

28ब, 29अ, 30ब, 33ब

सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला) 41

प्रभाग क्रमांक -

1क, 2क, 4ब, 4क, 5क, 8ब, 9क, 10ब, 11ब, 11क, 12ब, 12क, 13ब, 13क, 14ब,

15क, 16क, 17ब, 18ब, 18क, 19ब, 20ब, 20क, 21ब, 21क, 22क, 23ब, 23क,

25ब, 25क, 26ब, 27ब, 27क, 28क, 29ब, 30ब, 31ब, 31क, 32ब, 32क, 33क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT