

मुंबई : मुंबईतील कुख्यात अंमली पदार्थ तस्कर रोमा आरिफ शेख उर्फ पगली (वय 37) हिला अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेने शासनच्या मंजुरीनंतर एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. तिची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी अंमली पदार्थ तस्करांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात धाड टाकून करोडोंचा अंमली पदार्थ जप्त करण्यात येत आहे.
या कारवाई दरम्यान उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा युनिट पथकाने मुंबईतील कुख्यात अंमली पदार्थ तस्कर रोमा आरिफ शेख उर्फ पगली हिच्या विरोधात स्थानबद्ध आदेश जारी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने मोठे यश मिळाले आहे.
जामिनावर सुटताच पुन्हा व्यवसायात
रोमा शेख उर्फ पगली हिच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे एनडीपीएस कायद्यान्वये एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. भायखळा पोलिसांनी तिच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील केली होती. मात्र जामिनावर सुटताच पुन्हा अंमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल. तिच्यावर स्थानबद्ध कारवाईसाठ शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर रोमा शेख उर्फ पगली हिची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात 1 वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.