नवी मुंबई: एकीकडे राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ असे अनेक उपक्रम राबवले जात असताना दिवाळे कोळीवाड्यातील शाळा परिसरात मात्र रात्री तळीरामांच्या दारू, सिगारेट गांजा अशा जंगी पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. यामुळे सकाळच्या सत्रातील शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या गावाच्या दक्षिण बाजूला नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्र.2 व शाळा क्र.117 या दोन शाळा असून, सकाळ आणि दुपारच्या सत्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेपासून काही अंतरावर समुद्र किनारा आणि निवांत बसण्याचे ठिकाण असल्याने अंधाराचा फायदा घेत रोज रात्री उशिरापर्यंत येथे तळीरामांच्या जंगी पार्ट्या होत आहेत. यामुळे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता या शाळेत शिकणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उशिरापर्यंत पार्ट्या रंगल्यानंतर दारुच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ जागेवरच सोडून तळीराम निघून जात असल्याने परिसरात प्लास्टिक ग्लास, पाण्याच्या बाटल्या, बियर आणि विविध दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच पडलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांसह समुद्रकिनारी वावरणाऱ्या स्थानिक कोळी बांधवांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला असून, याठिकाणी अस्वछताही पसरत आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी शाळा परिसरात गस्त वाढवून संबंधित तळीरामांवर कडक कारवाई करण्याची मागणी दिवाळे ग्रामस्थांकडून केली जात आहे.