ठाणे: आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीची पहिलीच बैठक ठाण्यात पार पडली असून या पहिल्याच बैठकीत युतीचे स्पष्ट संकेत असतानाही भाजपने मात्र पुन्हा एकदा वेगळा सूर लावला आहे. निवडणूका युतीमध्ये लढायच्या कि स्वतंत्रपणे लढायच्या कि हे राजकारण जुने असून युती असो वा नसो भाजपला नेहमीच यश मिळाले आहे, असे विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले आहे. त्यामुळे युती संदर्भात सकारत्मक चर्चा असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्याप सकारत्मक चित्र स्पष्ट नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
मुंबई, ठाणे तसेच जिथे अशक्य असेल तिथे युतीमध्ये लढण्याचे संकेत भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. ठाण्यात युती होणार कि नाही, याबाबत अजून चित्र स्पष्ट नसले तरी दोन्ही पक्षांतील जागावाटपाची सकारत्मक चर्चा पुढे सरकावी यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेकडून खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, सचिव राम रेपाळे तर भाजपकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे उपस्थित होते. या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमदार संजय केळकर यांनी मात्र ही बैठक सकारात्मक झाली असून केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे. यामध्ये कोणत्या पद्धतीने जागांचं वाटप करायला हवं, एकूण प्रभागात कशा पद्धतीने कार्य करायचं याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येणार्या काळात दुसरी बैठक देखील होईल या दोन बैठकांमध्येच जागावाटप पूर्ण होईल असा दावा देखील त्यांनी केला आहे. 2017 ला पहिल्यांदा निवडणूक झाली.
आठ वर्षात डोक्यावरून बरेच काही गेले आहे, नव्या वर्षांमध्ये ही निवडणूक होत आहे, अनेक गोष्टी बदलल्या आहेत परिस्थिती बदलली आहे, भाजपाने आधीच इच्छुकांचे फॉर्म देखील घेतलेले होते ते साडेपाच ते सहाशे फॉर्म आहेत. युती ही सन्मानपूर्वकच व्हायला हवी त्या दष्टीने आजच्या बैठकी मधून वाटचाल सुरू असल्याचे केळकर म्हणाले. युतीचं आणि स्वतंत्र लढण्याचे राजकारण आजचे नाही. गेल्या अनेक निवडणुका या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने युतीमध्ये लढल्या आणि युतीशिवाय लढल्या आहेत. दोन्ही वेळेला आम्हाला यश मिळाले आहे, असे केळकर यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेसमोर निवडून येण्याचा फॉर्मुला ठेवला असल्याचे केळकर यांनी या वेळी सांगितले.
विद्यमान नगरसेवकांवर अन्याय होणार नाही : खा. नरेश म्हस्के
शिवसेना किंवा भाजपचे नगरसेवक असो, जे विद्यमान नगरसेवक आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे आश्वासन या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहे. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. एकत्र मिळून आणि ठाणे महानगरपालिकेत युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचे त्यांनी सांगितले. आमचं फॉर्मुला वगैरे काही ठरलं गेलेलं नाही. आमच्या सीटिंग जागांवर सध्या चर्चा सुरु आहे. आमची आकडेवारीवर चर्चा झालेली नाही. कोणाला किती टक्के असं काही विषय नाही. युतीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ हा विषय नाही आहे. आम्ही महायुतीचे पक्ष आहोत.महायुतीचा धर्म पाळला जाईल असे म्हस्के यांनी सांगितले. आमच्या महायुतीच्या 100 हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्ता काम करतो त्या ठिकाणी नाराज होत असतो. शिवसेनेमध्ये नेत्यांचं ऐकलं जातं. त्या नंतर तो निर्णय मान्य केला जातो असे म्हस्के यांनी सांगितले.
शिवसेनेतील इच्छुकांना अर्जाचे वाटप...
ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले जात आहेत, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यानंतर बुधवारी फॉर्म घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे. टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात इच्छुक उमेदवारांना फॉर्म दिले जात आहेत, खासदार नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्या उपस्थितीत फॉर्म वाटप करण्यात आले आहे. ठाण्यात एकूण 131 जागा आहेत, त्यात भाजप सोबत युती असल्याने जागा वाटप अजून निश्चित व्हायचे आहे, मात्र पक्षातील इच्छुक उमेदवार किती आणि आपली ताकद किती हे बघण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात आहेत, आता यापैकी किती इच्छुकांना पालिकेचे तिकीट मिळणार आणि किती नाराज होणार हे बघणे महत्त्वाचे आहे.