

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेची युती निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. भाजप-शिंदेसेनेच्या युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला असून भाजपला १०० तर शिंदे सेनेच्या वाट्याला अवघ्या २२ जागा आल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजते आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच महापालिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय हालचाली गतिमान बनल्या आहेत. राजकीय पक्षांकडूनही या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. सत्तारुढ भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या निवडणुका महायुतीद्वारे लढवणार की स्वबळावर या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून खल सुरू आहे. भाजपने नाशिक महापालिकेत १०० प्लसचा नारा दिला असल्याने भाजप या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे.
किंबहुना भाजपच्या नाशिकमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्र मेळाव्यातही निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, वरिष्ठांच्या चर्चेनंतर आता प्रथम युती व नंतर जागा वाटप निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थान दिले जाणार नसल्याचे समजते. शहरात राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने अगदी क्षुल्लक जागा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु, राष्ट्रवादीने जागा वाटपाचा फॉर्म्युला अमान्य केल्याने राष्ट्रवादीला टाळत भाजप व शिंदेसेनेची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेना (उबाठा) व मनसेला फायदा होत दोन्ही ठाकरे बंधूंना स्थानिकमध्ये ताकद मिळू नये म्हणून महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र आल्याचे बोलले जात आहे.
भाजप 100 जागांवर ठाम
नाशिक महापालिकेतील १२२ जागांपैकी १०० जागांवर निवडणूक लढवण्यास भाजप ठाम आहे. महायुतीत शिंदेसेनेला १५ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात जागा देण्याचे नियोजन होते. परंतु गत निवडणुकीत ३५ जागा मिळवणाऱ्या शिंदे सेनेने १५ जागा घेण्यास असहमती दर्शवल्याने शिंदे सेनेला २२ जागा देण्याचे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.