ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात तिकीट न मिळाल्याने शिवसेनेच्या 9 माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली आहे. ही बंडखोरी रोखण्यात यश येते किंवा नाही हे, उद्या शुक्रवारी स्पष्ट होईल.
ठाणे महापालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या 131 जागांच्या निवडणुकीसाठी तब्बल 1107 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सर्वाधिक 21 उमेदवारी अर्ज प्रभाग 31 ड मध्ये, तर 8 अ आणि 21 ब मध्ये प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी झालेल्या छाननीमध्ये 99अर्ज बाद झाले, तर 1008 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यावेळी महायुतीचे नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचे षड्यंत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी रचल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला.सत्ताधाऱ्यांचे अपुरी कागदपत्रे आणि अर्जाच्या रकान्यामध्ये निरंक शब्द लिहिलेले नसतानाही ते अर्ज वैध ठरले आणि विरोधी पक्ष आणि अपक्षांचे तशाच प्रकारचे असलेले अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे.
दुसरीकडे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बंडखोरी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जिंतेद्र आव्हाड आदी सर्व पक्षीय नेत्यांना कसरत करावी लागली.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी झाली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन युती-आघाडीला डोकेदुखी वाढविली आहे. महापालिकेच्या 131 जागांसाठी चार सदस्यीय पद्धतीनुसार निवडणूक होत आहे. महायुती झाल्याने यावर्षी नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केले, तर अनेक माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला, तर काहींनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली. तब्बल 1107 अर्ज भरण्यात आले. त्यांची छाननी झाली असता 99 अर्ज बाद करण्यात आले. प्रभाग क्रमांक 31 ड सर्वसाधारण प्रभागात 21 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग 8 अ अनुसूचित जाती महिला आणि 21 ब सर्व साधारण महिला प्रवर्गात फक्त दोन-दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रभाग 17 अ , 33 ब मध्ये प्रत्येकी तीन -तीन उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.
माजी विरोधी पक्षनेता प्रमिला किणी (शिवसेना)
माजी नगरसेवक भूषण भोईर (शिवसेना)
माजी नगरसेवक मधुकर पावशे (शिवसेना)
माजी नगरसेवक बालाजी काकडे (शिवसेना)
माजी नगरसेवक लॉरेंस डिसोझा (शिवसेना)
माजी नगरसेविका निशा पाटील (शिवसेना)
माजी नगरसेवक महादीप बिष्ट (शिवसेना)
माजी नगरसेविका मंगल कळंब (शिवसेना)
माजी नगरसेविका सुरेखा पाटील (शिवसेना)
निखिल बुडजडे शिवसेना)
किरण नाकती (शिवसेना)
मंगेश कदम (शिवसेना)
दत्ता घाडगे (भाजप)
अर्चना पाटील (भाजप)
विकास दाभाडे (भाजप)
अपक्षांबरोबर मनसेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. हे अर्ज बाद करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करीत महायुतीच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आणि तशी तक्रार महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त ( निवडणूक ) उमेश बिरारी यांच्याकडे केली आहे.