ठाणे : कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलवरील डीपी किंवा स्टेट्सवर ठेवल्यास खबरदार असा सज्जड दम ठाणे पालिका उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. गोदेपूरे यांनी लेखी आदेश काढले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
ठाणे पालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी काही अधिकारी आणि कर्मचारी राजकीय पक्षासाठी काम करतात. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप, स्टेट्सवर राजकीय नेत्याचे फोटो ठेवतात यावर आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत ठाणे महापालिकेने आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कृतीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार महापालिका मुख्यालय उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी तसेच लेखी आदेश काढले आहेत. यापुढे जर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईल किंवा व्हाट्सअपवर राजकीय नेत्यांचे किंवा पक्षाचे पोस्टर छायाचित्र, बॅनर ठेवू नये असा स्पष्ट उल्लेख आदेशात नमूद करण्यात आला आहे.
पूर्वसूचना न देता शिस्तभंगाची कारवाई
ठाणे पालिकेचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांने आपल्या मोबाईल स्टेटसवर नेत्यांचा फोटो, व्हिडिओ ठेवल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असा इशारा उपायुक्त गोदेपुरे यांनी दिला आहे.