ठाणे : दिलीप शिंदे
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती आणि ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी (एसपी) मनसे महाविकास आघाडी आमनेसामने असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह एकाही अधिकृत पक्षाला 131 जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत.
त्याचबरोबर वाटाघाटीत पदरात पडलेल्या सर्व जागांवरही उमेदवार उभे करण्यास सर्वच राजकीय पक्षांना अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यातील 20 प्रभागांमध्ये शिवसेनेला एकही उमेदवार उभा करता आला नसून शिवसेना ठाकरे गट ही मुंब्र्यातून गायब झाल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 15 जानेवारीला मतदार होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरस असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांमुळे चौरंगी लढत होत आहे. प्रचाराचा धुरळा उडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी ठाणेकरांना हाक घातली आहे. असे असताना मतदार राजा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची घालमेल सुरु झाली आहे. कुणाचा झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती त्यांची झालेली दिसून येते.
महापालिका निवडणुकीत महायुतीला देखील 131 उमेदवार जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे करण्यास अपयश आलेले आहे. मग इतर पक्षांची अस्वस्था किती बिकट असेल हे दिसून येते. शिवसेनेच्या वाट्याला 91 जागा तर भाजपच्या वाट्याला 40 जागा आल्या होत्या. आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील चार जागा ह्या मुंब्रा विकास आघाडीसाठी राखून ठेवल्या
मात्र मुंब्रा विकास आघाडीने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेला तोंडघशी पाडले. त्यामुळे मुंब्र्यातील प्रभाग 26, प्रभाग 30, प्रभाग 31, प्रभाग 32, प्रभाग 33 या पाच प्रभागातील 20 जागांवर शिवसेनेचा चिन्ह असलेला एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उरलेला उभा नाही. त्यामुळे मुंब्र्यातून शिवसेना हद्दपार झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण होती घेतलेले आहे.
महाविकास आघाडीतर्फे 124 उमेदवार रिंगणात
भाजपच्या 40 जागांपैकी एका जागेवर त्यांचा उमेदवार नसून त्यांना पुरस्कृत उमेदवार करावा लागला आहे. या दोन्ही सक्षम पक्षांची अशी अवस्था झाली असताना ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि दादांची राष्ट्रवादी हे पक्षही कसे अपवाद राहणार आहेत. कुठल्याच अधिकृत पक्षांना एबी फॉर्म मिळालेल्या सर्वच्या सर्व जागा लढवता आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीने कुठल्या पक्षाला किती जागा सोडण्यात आल्या हे अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी ठाकरे शिवसेना 66 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प. ) 35 आणि मनसेचे 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी उमेदवारांचे चिन्ह बदलण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतर्फे दोन प्रभागात उमेदवारी अर्जच दाखल करण्यात आले नसून तांत्रिक कारणास्तव 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणि 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतर्फे 124 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.