डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील उल्हास खाडीत शनिवारी दुपारी वडील आणि त्यांची अडीच वर्षाची मुलगी वाहून बेपत्ता झाली होती. शनिवारी दुपारपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस संयुक्तपणे शोध मोहीम राबवित आहेत. तथापी 24 तास उलटूनही बेपत्ता बाप-लेकीचा शोध लागला नाही, दरम्यान तपास पथकांच्या हाती खाडीत वाहून आलेला एक मृतदेह हाती लागला आहे. Thane News
डोंंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहणारे अनिल सुरवाडे (40) शनिवारी दुपारी दीड वाजता त्यांची अडीच वर्षाची मुलगी ईरा हिला घेऊन कुंभारखाणपाड्या जवळच्या खाडी किनारी भागात फिरण्यासाठी गेले होेते. टेडी आणि चप्पल बाजूला ठेवून खाडी लगतच्या जेट्टीवर ईरा खेळत होती. वडील अनिल तिच्यापासून काही अंतरावर बसले होते. खेळताना तोल जाऊन ईरा जेट्टीवरून खाडीत पडली. मुलगी पडली म्हणून वडील अनिल यांनी तत्काळ खाडीत उडी मारली. ओहोटीच्या वेळी पाण्याचा वेगवान प्रवाह आणि दलदलीमुळे ते मुलीला वाचवू शकले नाहीत. मुलगी ईराला वाचविण्याचा प्रयत्नात वडील अनिल वाहून गेले. Thane News
हा प्रकार खाडीच्या किनाऱ्यापासून दूर अंतरावर असलेल्या दोन तरूणांना दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस शनिवारी दुपारपासून बेपत्ता बाप-लेकीचा शोध घेत आहेत. मात्र 24 तास उलटूनही रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत खडीत बेपत्ता झालेले अनिल आणि त्यांची कन्या ईरा अद्याप हाती लागली नसल्याने सुरवाडे कुटुंबीय चिंतातूर झाले आहे. तर या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Thane News खाडीत आढळला मृतदेह
रविवारी सकाळी बेपत्ता बाप-लेकीचा शोध घेत असताना अग्निशमन दलाच्या जवानांना खाडी किनापट्टी भागात ओहटीच्या वेळी कल्याण परिसराकडून वाहून आलेला एक मृतदेह आढळला. तपास पथकांनी ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा